
कोट्यवधी हिंदू आणि लाखो शिवसैनिकांचे दैवत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 96 वा जन्मदिन आहे. देशभरात शिवसेनाप्रमुखांना आज अभिवादन केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
‘श्री बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो. जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे एक अद्वितीय असे नेते म्हणून ते कायम स्मरणात राहतील’, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त राज्य शासनाच्या वतीने मानवंदना दिली जाईल. शिवसैनिक व शिवसेनाप्रेमी गर्दी टाळण्याची शिस्त पाळून आपल्या लाडक्या साहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करतील. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी कशाचीही पर्वा न करता झपाटल्यासारखे काम करा, असा मूलमंत्र शिवसेनाप्रमुखांनी दिला होता. त्याच विचारांनी शिवसेनेचे कार्य अखंडपणे सुरू आहे. कोरोना नियमांमुळे शिवतीर्थावर जाणे अनेकांना शक्य होणार नसले तरी शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे.




























































