पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, राज ठाकरेंसह प्रमुख नेत्यांनी बॉलीवूडच्या हीमॅनला वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते आणि बॉलीवूडचा हिमॅन धर्मेंद्र यांचा वयाच्या 89 व्या वर्षी मृत्यू झाला. धर्मेंद्र यांच्यावर जुहू येथील पवनहंस स्मशानभुमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अमिताभ बच्चन, सलमान खान, अजय देवगनसह अनेक दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना शेवटचा निरोप देण्यासाठी स्मशानभुमीत उपस्थित होते. अभिनेत्यांसह राजकीय नेत्यांनी सुद्धा धर्मेंद्र यांना ट्वीटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वाहिली धर्मेंद्र यांना श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाल्याचं म्हटलं आहे.

धर्मेंद्र यांच्या जाण्याने भारतीय कलाविश्वाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि देव त्यांच्या कुटुंबाला, मित्रांना आणि त्यांच्याशी संबंधित सर्वांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र देओल ह्यांच्या निधनाचे वृत्त दु:खदायक आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांनी साकारलेल्या दमदार भूमिका येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि देओल कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. ‘शोले’मध्ये धर्मेंद्र यांनी साकारलेला ‘वीरू’ आजही घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक आणि तडफदार नायक म्हणून भारतीय रसिकमनांवर अधिराज्य गाजवतो आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

जवळजवळ सात दशकांपासून चित्रपटसृष्टीतील त्यांचे अद्वितीय योगदान नेहमीच आदर आणि प्रेमाने लक्षात ठेवले जाईल, असं म्हणत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून, अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सिनेमाच्या खूप गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस होता आणि म्हणूनच सर्वसामान्यांनाही तो कायम आपला हिरो वाटत राहिला, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.