
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपपूर्तीचा देशभरात कौतुकसोहळा सुरू असताना खुद्द मोदी यांनीही आज घटक पक्षांच्या बैठकीत बोलताना स्वस्तुतीचे इमले बांधले. एनडीएचे सरकार आल्यानंतर मागील 12 वर्षांत देशाचे भाग्य बदलले, असे मोदी म्हणाले.
2014 च्या आधीची जी दशपं होती त्यामध्ये देशात सातत्याने अस्थिरता पाहायला मिळाली. काँग्रेस सत्तेत असताना सरकार नव्हते, नीती नव्हती, विचार नव्हता. गतीने विकास करणे शक्यच नाही, असे काँग्रेसकडून भासवले जात होते, अशी टीका मोदींनी केली.
‘भारतमातेची सेवा करण्याची संधी इतका दीर्घकाळ मला मिळाली, हे मी माझे सौभाग्य मानतो. ईश्वराच्या कृपेनेच हे शक्य झाले असे मला वाटते. मी कायमच देशाच्या सेवेकडे अध्यात्मिक साधना म्हणून पाहिले. ही साधना माझ्या एकटय़ाची नाही तर हा सामूहिक सेवेचा यज्ञ आहे, असेही मोदी म्हणाले.




























































