
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचा मुद्दा उचलत त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आज स्पष्ट संकेत दिले आहेत. एका घरात दोन कायदे चालू शकत नाहीत तर मग देश कसा चालेल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी भोपाळ येथे भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावर्षी होणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुका आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्याचा मुद्दा उचलला. कायद्यावरून मुस्लिमांना भडकवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. एका घरात एका सदस्यासाठी एक कायदा आणि दुसऱ्याकरिता वेगळा कायदा असेल तर घर चालणार आहे का? मग अशा दोन व्यवस्थेमुळे देश कसा चालेल? संविधानामध्ये नागरिकांच्या समान अधिकाराचा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयानेही देशात समान नागरी कायदा आणा असे म्हटले आहे, असे मोदी यांनी सांगितले.
…तर पाकिस्तान, इंडोनेशिया, कतार, सिरियात तिहेरी तलाक का नाही?
जे तिहेरी तलाकचे समर्थन करतात त्यांना मुस्लिम महिलांवर घोर अन्याय करण्याचा परवाना हवा आहे. या लोकांना वोट बँकेचे राजकारण करायचे आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली. इजिप्तमध्ये 80-90 वर्षांपूर्वी तिहेरी तलाक संपुष्टात आणला आहे. तिहेरी तलाक जर इस्लामचा एवढा आवश्यक पैलू आहे तर मग पाकिस्तान, इंडोनेशिया, कतार, जॉर्डन, सिरिया, बांगला देशात तिहेरी तलाक का नाही? असा सवाल त्यांनी केला.
मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप
मणिपूरमधील हिंसाचार थांबलेला नाही. महागाई, बेरोगारीसह अनेक प्रश्न देशासमोर आहेत. या मूळ मुद्दय़ांवरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून समान नागरी कायद्यासारखे मुद्दे उपस्थित केले जात आहेत, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केला.

























































