मोदींचे आसामात काळ्या झेंड्यांनी स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । गुवाहाटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाममध्ये सलग दोन दिवस काळ्या झेंड्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या विरोधातील हे आंदोलन आसाम युवा छात्र परिषद, कृषक मुक्ती संग्राम समिती आणि गुवाहाटी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केले.

मोदी हे राजभवन येथून विमानतळाकडे निघाले असताना आज माचरवोवा येथे आसाम युवा छात्र परिषदेने त्यांच्यासमोर काळी निशाणे फडकवली. त्यानंतर काही मिनिटांनी जलुकबारी विभागात गुवाहाटी विद्यापीठ येथेही पंतप्रधानांना काळ्या निशाणांना तोंड द्यावे लगाले. त्याआधी शुक्रवारी मोदी यांना विमानतळावरून राजभवनला जाताना चार ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले.

जलुकाबारी, अदाबारी, फॅन्सी बाजार, उझान बाजार या ठिकाणी मोदी यांच्या विरोधात काळी निशाणे फडकवत निदर्शने करण्यात आली. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही झाली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे लोकसभेत 8 जानेवारीला मंजूर झाले असून राज्यसभेत सध्या प्रलंबित आहे. त्या विधेयकाला आसाममध्ये विविध संघटनांचा कडाडून विरोध आहे.