पीएमसी बँक घोटाळा,खातेदारांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) अद्याप कुठली पावले उचलली आहेत. तसेच यातून मार्ग काढण्यासाठी पुढील दिशा काय असेल, याची माहिती 13 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात सादर करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआयला दिला आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी 19 नोव्हेंबर रोजी होईल.

पंजाब आणि महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खातेदारांना त्यांच्याच खात्यांतून पैसे काढण्यासाठी घातलेल्या निर्बंधामुळे खातेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या घटनेनंतर अनेकांनी जोगेश्वरीचे शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची भेट घेतली. त्यानंतर वायकर यांनी याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला. खातेदारांना तत्काळ दिलासा मिळावा, यासाठी 11 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका केली. पीएमसी बँकेतील खातेदारांना तत्काळ पैसे मिळावे आणि त्यांचे लॉकर हाताळण्यासाठी एकच नियमावली करण्यात यावी, अशी विनंती वायकर यांच्या वकील तमसीन मोनीस यांनी केली. या याचिकेवर आज पुढील सुनावणी घेण्यात आली.

पीएमसी खातेदारांना दिलासा देण्यासाठी आरबीआयने अद्याप कुठली पावले उचलली आहेत. यापुढे आरबीआयची पुढील दिशा काय असेल, याची लेखी माहिती 13 नोव्हेंबरपर्यंत कोर्टाला सादर करण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले आहेत. यापुढे आधी दाखल करण्यात आलेल्या पीएमसी बँकेसंदर्भातील याचिकांचाच विचार करण्यात येईल. नव्याने दाखल करण्यात येणाऱ्या याचिकांचा विचार केला जाणार नाही, असेही न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेचा पाठपुरावा वकील दीप्ती वायकर- पोतनीस आणि वकील प्राजक्ता वायकर- महाले करीत आहेत.