उलटय़ा-जुलाबाने चिमुकले विद्यार्थी हैराण

242

 

सामना ऑनलाईन| येवला

येवला तालुक्यातील नगरसूल येथील दादमळा शाळेतील 22 विद्यार्थ्यांना आज सकाळी पोषण आहारातून विषबाधा झाली. पोषण आहारातील दूध आणि खिचडी खाल्ल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना उलटय़ा आणि जुलाब सुरू झाले. अधिक उपचारासाठी या मुलांना नगरसूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेची दादमळा येथे वस्तीशाळा असून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग या ठिकाणी आहेत. विद्यार्थी सकाळी शाळेत आले असता अल्पोपाहाराच्या वेळी शाळेत मुलांना दूध व खिचडी देण्यात आली .यावेळी अनेक विद्यार्थी यांनी दूध पिण्यास नापसंती दाखवली; पण काही विद्यार्थ्यांनी सकाळी दूध व नंतर शाळा सुटण्यापूर्वी खिचडी खाल्ली. दूध व खिचडी खालेल्या मुलांना शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना उलटय़ा होऊ लागल्याने मुले घाबरून गेले. पालकांनी थेट आपल्या मुलांना घेऊन नगरसूल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सरपंच प्रसाद पाटील, पदाधिकारी व ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली.

रात्री नगरसूल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी. सूर्यवंशी, एस. आर. कांबळे, आरोग्यसेवक एन. डी. तिरसे यांनी अधिक उपचार करून विद्यार्थ्यांना देखरेखीखाली ठेवले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्या सविता पवार, बाळासाहेब पवार, कांतिलाल साळवे, सरपंच प्रसाद पाटील, ग्रामविकास अधिकारी गोरख निकम, उमेश देशमुख आदींनी भेट दिली. रुग्णालय प्रशासनाने तालुका पोलीस ठाण्याला घटनेची खबर दिली असून पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया आहारात अंडी, दूध हे बंद करण्यात यावे. यात गुणवत्ता राहत नाही. याऐवजी बिस्कीट देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. याबाबत आम्ही प्रशासनाकडे हे सुरू करण्याची मागणी करू.

विजय पैठणकर, पालक नगरसूल

बाधित विद्यार्थी

अमृता पैठणकर, निखिल पैठणकर, तनुषा घाडगे, राहुल कोल्हे, पूनम पैठणकर, पवन पैठणकर, अमृता मोरे, राधा मोरे, सार्थक जाधव, वर्षा पैठणकर, कृष्णा पैठणकर, सोनाली पवार, जिजाबाई गायकवाड, एकनाथ गायकवाड, अंकिता पैठणकर, कैलास जाधव, आकाश जाधव, साहेबराव पवार, ईश्वर पवार या विद्यार्थ्यांवर नगरसूल येथेच उपचार सुरू आहेत.

दूध, अंडे बंद करा

नगरसूलदादमळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील 22 विद्यार्थ्यांना दूध प्यायल्यानंतर विषबाधा झाली असून मुलांना दूध अंडे देण्यात येऊ नये अशी मागणी पालकांनी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या