पाकव्याप्त कश्मीरातील दहशतवादी कॅम्पवर हिंदुस्थानी तोफगोळे, 22 अतिरेक्यांसह दहा पाकिस्तानी जवान ठार

353

शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे दुःसाहस करणाऱ्या पाकिस्तानला आज हिंदुस्थानने चांगलाच धडा शिकवला. पाकिस्तानी लष्कराने गोळीबार करताच हिंदुस्थानी तोफांनी आग ओकण्यास सुरुवात केली. पाकव्याप्त कश्मीरातील तीन दहशतवादी कॅम्प नेस्तनाबूत करण्यात आले. यात 22 अतिरेक्यांसह पाकिस्तानी लष्कराचे दहा जवान ठार झाले. ठार झालेले अतिरेकी जैश ए मोहम्मद व लश्कर ए तोयबाचे असल्याचे सांगण्यात आले. हिंदुस्थानने केलेल्या जबरदस्त पलटवारामुळे थरकाप उडालेल्या पाकिस्तानने तातडीने हिंदुस्थानी उच्चायुक्तांना पाचारण केले.

जम्मू-कश्मीरातून कलम 370 हद्दपार करण्यात आल्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. दोन महिन्यांपासून पाकिस्तानने सीमेवर अशांतता निर्माण केली असून दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. शनिवारपासून कुपवाडा सीमेवर पाकिस्तानी लष्कर गोळय़ांचा वर्षाव करत होते. आज सकाळीही पाकिस्तानी लष्कराने गोळीबार सुरू करताच हिंदुस्थानने उखळी तोफांचा वापर केला. पाकव्याप्त कश्मीरातील अंतमुकाम येथे असलेल्या दहशतवाद्यांच्या कॅम्पांना निशाणा बनवण्यात आले. हिंदुस्थानी तोफखान्याने आग ओकण्यास सुरुवात करताच पाकिस्तानची दाणादाण उडाली. उखळी तोफांच्या माऱयात अंतमुकाम येथील दहशतवाद्यांचे सात कॅम्प नेस्तनाबूत झाले तर पाकिस्तानचे पाच जवान ठार झाले.

शांतता धोक्यात आणाल तर…
कलम 370 हटवण्यात आल्यानंतर कश्मीर खोऱयात शांतता आहे, मात्र ही शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला मुंहतोड उत्तर दिले जाईल असा खणखणीत इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला. कुपवाडा सीमेवर उडालेल्या धुमश्चक्रीत पाकिस्तानचे 6 ते 10 सैनिक ठार झाले असून पाकव्याप्त कश्मीरातील दहशतवादी तीन अड्डे नष्ट केल्याची माहिती त्यांनी दिली.

उच्चायुक्तांकडे थयथयाट
कुपवाडा सीमेवर जबरदस्त प्रत्युत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानचा थरकाप उडाला. घाबरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानचे उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांना पाचारण करून प्रचंड थयथयाट केला. दरम्यान, पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने आमच्या गोळीबारात हिंदुस्थानचे नऊ जवान ठार झाल्याची फुशारकी मारली.

बोफोर्सची कर्तबगारी
कारगील युद्धामध्ये हिमालयाच्या कपारींमध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांवर अचूक मारा करून बोफोर्स तोफांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. आजही हिंदुस्थानी लष्कराने बोफोर्स तोफांचा मारा करून अंतमुकाम येथील दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या