
सामना प्रतिनिधी । अमरावती
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल पटेल यांच्यावर आज मंगळवारी पहाटे अचलपूर शहरातील कुख्यात तीन ते चार गुंडांनी लोखंडी रॉड आणि सळीने हल्ला करून त्यांची हत्या केली. पटेल यांच्या हत्येमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे.
मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास परतवाडा येथील पोलीस कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ठाकरे यांनी या सात ते आठ आरोपींना भर रस्त्यावर दारू पीत असताना बघितले. ठाकरे यांनी त्या दारुड्याना हटकले असता काहीजण तिथून पळाले तर काहींनी पोलिसांसोबत हुज्जतबाजी सुरु केली . त्यानंतर शुभांगी ठाकरे यांनी त्या दारुड्यांना पोलिसी खाक्या दाखवीला आणि काही वेळानंतर सोडून देण्यात आले. त्यानंतर हे सर्व आरोपी अचलपुरकडे जात असतांना आपल्याला मारहाण झाल्याचा मनात राग धरून महिला अधिकारी आणि कर्मचारी पोलिसांचा शोध घेत होते. त्याचवेळी अचलपुर पोलिस स्टेशनमधून घरी जात असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल पटेल त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांना अडवून आरोपिंनी रॉड व सलाखीने डोक्यावर वार केले. यामध्ये शांतीलाल पटेल मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. यातील तीन कुख्यात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे शांतीलाल पटेल यांच्या पत्नी सुद्धा अचलपूर पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांवर वारंवार होत असलेल्या जीवघेण्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ‘पोलीस पत्नी एकता मंच’ पुढे आला आहे. पोलिसांवरील होत असलेल्या हल्ल्यांबद्दल सरकारने कठोर पावले उचलावीl अन्यथा पोलीस पत्नी यापुढे कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा ‘पोलीस पत्नी एकता मंच’ तर्फे देण्यात आहे.
या आधी सुद्धा अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनचे सतीश मडावी या पोलीस कर्मचार्यावर २७ मे रोजी अशाच प्रकारे अवैध दारू विक्रेत्यांनी हल्ला करून खून केला होता, या घटनेला तीन महिने होत नाही तर ही दुसरी घटना जिल्ह्या मध्ये घडली आहे. त्यामुळे राज्य सरकार पोलिसांवरील वाढत्या हल्ल्या प्रकरणी काय पावलं उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






























































