आई कोरोना योद्धा म्हणून मुंबईत; 6 वर्षांच्या रुद्रला पोलिसांकडून वाढदिवसाचे ‘सरप्राइज’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या जागतिक संकटाशी सामना करताना अनेकदा खाकी वर्दीतील माणूसकीच्या झऱ्याचे दर्शन अनेकांना घडले. मेहकरमध्येही पोलिसांनी संवेदनशीलतेचे दर्शन घडवत आईपासून दूर असलेल्या सहा वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसाला उपस्थित राहत त्याला अनोखे सरप्राइज दिले आहे.

डॉ. किशोर रामसिंग बिबे हे डोणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी या राज्य कामगार विमा योजना रुग्णालय वागळे इस्टेट, ठाणे याठिकाणी असलेल्या कोविड रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहेत. मुंबई शहरात कोरोनाचा प्रकोप असल्याने बिबे दाम्पत्याचा सहा वर्षाचा रुद्र हा मुलगा वडिलांसोबत डोणगावला राहतो. त्याची आजी त्याचा सांभाळ करत आहे. रुद्रचा सहावा वाढदिवस शुक्रवारी होता. डॉ. बिबे यांनी मेहकर येथे राहत असलेले त्यांच्या मोठ्या भावाकडे रुद्रचा वाढदिवस साजरा केला. आईपासून दूर राहत असलेल्या सहा वर्षाच्या रुद्रच्या वाढदिवसाबाबत मेहकरचे ठाणेदार आत्माराम प्रधान यांना समजले. त्यांनी सहकाऱ्यासह बिबे यांच्या घरी जाऊन रुद्रला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भेटवस्तू दिल्या. आईपासून दूर राहून वाढदिवस साजरा होत असल्याने रुद्र हिरमुसला होता. मात्र, पोलिसांच्या उपस्थितीने त्याला अनोख सरप्राइज मिळाले आणि त्याचा आनंद द्विगुणित झाला. पोलिसांनी दाखवलेल्या संवेदनशीलता आणि आत्मीयतेमुळे बिबे कुटुंबीय भारावले होते.