नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दारुड्यांची पोलिसाला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fight
file photo

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ट्रिपल सीट जाणाऱ्या दारुड्यांनी चक्क पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला मारहाण करून त्याच्या जवळची दीड हजार रुपयांची रक्कम लुटल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री दीडच्या सुमारास जालना रोडवरील बाबा चौकातील एलआयसी कार्यालय जवळ घडला. खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एका दारुड्याला अटक केली, तर दोघांचा शोध सुरू आहे.

छावणी नंदनवन कॉलनीतील पोलीस अंमलदार प्रवीण श्रीकृष्ण मुळे वय (वर्ष 35) हे पुंडलिक नगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आहेत. थर्टीफर्स्टच्या बंदोबस्तासाठी 31 डिसेंबरच्या चार वाजेपासून ते एक जानेवारीच्या पहाटे दीड वाजेपर्यंत हॉटेल चौरंगी चौकात ड्युटी आटोपून ते दुचाकीने क्रांती चौक मार्गे एलआयसी कार्यालयाच्या बाजूने जात असताना त्यांच्या पाठीमागून एका स्कुटीवरून ओली पार्टी करून ट्रिपल सीट जाणारे हे वाहन आडवेतिडवे चालवत असल्यामुळे त्यांनी व्यवस्थित चालवा अशी समज दिली. याचा राग मनात धरून तिघांनी मुळे यांना चौकात अडवून लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण करून जखमी केले, तसेच खिशातील 1460 रुपये हिसकावून पळ काढला. जाताना तिघांनी गाडीची तोडफोड देखील केली.

या संतापजनक घटनेनंतर प्रवीण मुळे यांनी तत्काळ नियंत्रण कक्षासह पुंडलिक नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नियंत्रण कक्षाचे कर्मचारीदेखील हजर झाले. सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी स्कूटीच्या क्रमांकावरून मारहाण करणारा संसार नगरातील दारूडा नितीन भास्कर वक्ते याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवून दोन साथीदारांबाबत विचारणा केली असता त्याने संसार नगरातील गौतम राम कदम आणि दीपक रमेश वक्ते यांनी मारहाण केल्याचे सांगितले. या प्रकरणात प्रवीण मुळे यांच्या फिर्यादीवरून वेदांतनगर पोलिसांनी नितीन वक्तेसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील दोघे फरार आहेत. ते जालना जिल्ह्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांवर दडपण आणण्याचा प्रयत्न

पोलिसांना मारहाण झाल्याची घटना घडतात नियंत्रण कक्षाचे आणि पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत स्कूटीचे क्रमांकावरून नितीन व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यासाठी संसार नगरात पोहोचले असता वक्ते याने अटक होण्याच्या भीतीने आरडाओरड करत नागरिकांना जमा करून पोलिसांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करत बळाचा वापर करून फक्त याला ताब्यात घेतले. वक्ते हा देवगिरी महाविद्यालयात डान्स शिक्षक आहे. नितीन वक्तेने घातलेल्या गोंधळाचा फायदा घेत सोबत असलेल्या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला.