भाट्ये समुद्रकिनारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा पोलीस दलाचा अभिनव उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यातील पोलीस ठाणे स्तरावर 17 ठिकाणी शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षक अशा एकूण 7500 जणांना सहभागी करत मानवी 75 अंक तयार केला. हिंदुस्थानच्या संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना प्राणांची आहूती देणाऱ्या क्रांतीकारकांचे स्मरण यावेळी करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात आला. भाट्ये समुद्रकिनारी गोदुताई जांभेकर विद्यालय, एम. एस. नाईक हायस्कूल, अजिजा दाऊद हायस्कूल, शिर्के हायस्कूल, मिस्त्री हायस्कूल, सर्वकष विद्यालय, जी. जी. पी. एस. महालक्ष्मी हायस्कूल, नवनिर्माण हायस्कूल, गो. जो. महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी बी. एन. पाटील आणि जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ इंदराणी जाखड़ उपस्थित होत्या. तुम्ही नोकरीच्या शोधात न भटकता स्वतःचे कौशल्य वापरून विज्ञानामध्ये प्रगती करून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल होईल असा संकल्प करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील थोर इतिहास पुरुषांविषयी माहिती दिली. स्वांतत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती देत उपस्थितांना प्रोत्साहित केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस उपअधीक्षक राजेश शहा, प्रदीप कानडे, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, शिरीष सासणे, मारुती जगताप, धनाजी कळंत्रे, हेमंतकुमार पवार, रमेश निकम उपस्थित होते.