पोलीस डायरी – एटीएसची नामुष्की!

>> प्रभाकर पवार 

पश्चिम रेल्वेच्या मुंबई लोकलमध्ये 2006 साली साखळी बॉम्बस्फोट घडवून 189 प्रवाशांचे बळी घेण्यात आले. या हत्याकांडात सहभागी असलेल्या 12 आरोपींची उच्च न्यायालयाने नुकतीच (दि. 21 जुलै 2025) निर्दोष सुटका केली. याचा महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला प्रचंड धक्का बसला आहे. 2015 साली विशेष न्यायालयाने (मोक्का) या 12 आरोपींना दोषी ठरवून त्यातील पाच जणांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. विशेष न्यायालयाच्या या आदेशाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्याम चांडक व न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठाने सर्वच्या सर्व 12 आरोपींची सोमवारी आरोपींविरुद्ध सबळ पुरावे नसल्याचे कारण पुढे करून त्यांची निर्दोष सुटका केली. त्यामुळे महाराष्ट्र ‘एटीएस’ पार हबकून गेली आहे.

189 रेल्वे प्रवाशांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना सत्र न्यायालय दोषी ठरविते, तर उच्च न्यायालय तपासातील त्रुटींचा उल्लेख करून आरोपींना निर्दोष सोडते हे फारच अनाकलनीय व गंभीर वाटत आहे. अशी वकील वर्गात चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची घोषणा केली आहे.

अयोध्येत बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईत 13 बॉम्बस्फोट घडविण्यात आले. त्यात मोठी जीवित व वित्तहानी झाली. त्यानंतर मुंबईतील बॉम्बस्फोट मालिका थंडावल्या, परंतु 2002 साली गुजरातमध्ये घडलेल्या जातीय दंगलीनंतर मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट मालिका सुरू झाल्या. अतिरेक्यांनी गुजरात मुस्लिम रिव्हेंज फोर्स’ची स्थापना केली. इंडियन मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी महाराष्ट्र, बंगळुरू अहमदाबाद, दिल्ली आदी ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्याची जबाबदारी कधी इंडियन मुजाहिद्दीन, कधी लष्कर-ए-तोयबा, तर कधी गुजरात मुस्लिम रिव्हेंज फोर्सवाले घेत होते.

प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून महाराष्ट्र ‘एटीएस’ने अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी 2006 च्या जानेवारी महिन्यात सारा महाराष्ट्र पिंजून काढला. छत्रपती संभाजीनगर, परभणी, मालेगाव, बीड आदी जिल्ह्यांत धाडी घालून 42 किलो आरडीएक्स. 16 एके 56 रायफल्स, 50 हातबॉम्ब आदी मोठा शस्त्रसाठा हस्तगत करून दोन डझन अतिरेक्यांना अटक केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. गोधा कांडानंतर गुजरातमध्ये घडवून आणलेल्या जातीय दंगलीचा सूड उगविण्यात आला.

2006 च्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्र ‘एटीएस’ने मोठी कारवाई केली. स्थानिक अतिरेक्यांच्या नांग्या ठेचल्या. परंतु सहा महिन्यांनी पाकिस्तानी विषारी सापांनी आपला फणा वर काढला. 2006 च्या 11 जुलैचा तो मंगळवार होता. सायंकाळचे 6.30 वाजले होते. चर्चगेटहून बोरिवली, विरारकडे निघालेल्या सात लोकलमध्ये माटुंगा ते माहीम, वांद्रे ते खार, खार ते सांताक्रुझ. जोगेश्वरी, बोरिवली व मीरा रोड ते भाईंदरदरम्यान सात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. त्यात 189 प्रवाशांचे बळी गेले. 824 प्रवासी गंभीर जखमी झाले. प्रथम वर्गाच्या डब्यात अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. गोवंडी येथील एका घरात टाईम बॉम्ब बनविण्यात आले. प्लांट करून ते चर्चगेट व विरार लोकलमध्ये ठेवण्यात आले. या बॉम्बस्फोट मालिकेत अत्यंत क्रीम पब्लिक मारले गेले. कुणी इंजिनीअर, कुणी प्राध्यापक, कुणी वन अधिकारी, कुणी पोलीस, कुणी उद्योजक होते. अगदी ठरवून फर्स्ट क्लास कंपार्टमेंटला टार्गेट करण्यात आले होते. हिंदूंना टार्गेट करणाऱ्या अतिरेक्यांनी या लोकल बॉम्बस्फोटांत दहा मुस्लिम प्रवाशांचाही बळी घेतला. असे हे आरोपी निर्दोष सुटले याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. 26/11 च्या हल्ल्यात सहभागी असलेले फईम अन्सारी (मुंबई, गोरेगाव, मोतीलालनगर) व सबाऊद्दीन अहमद शेख (बिहार, मधुबनी) हे हिंदुस्थानमधील पाकिस्तानी हस्तक दोन वर्षे कुलाब्याला रेकी करीत होते. ते आरोपीही निर्दोष सुटले. मुंबईच्या सत्र व उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेला (इस्थर अनुह्या या इंजिनीअर तरुणीची बलात्कार करून हत्या करणारा) भानुदास सानप याचीही सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे निर्दोष सुटका केली. तेव्हा पहलगाम हत्याकांडप्रकरणी फरार असलेले अतिरेकी जर पकडले गेले तर तेही उद्या कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊन निर्दोष सुटले तर कुणी आश्चर्य वाटू नये.

11 जुलै 2006 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एटीएस’ने अटक केलेल्या आरोपींचे जबाब घेतले होते. ते जबाब पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करून घेतल्याचे आरोपींनी कोर्टात सांगितल्याने ते जबाब उच्च न्यायालयाने ग्राह्य धरले नाहीत. बॉम्बस्फोट घडविण्यासाठी वापरलेले बॉम्ब कोणत्या प्रकारचे होते याचेही पुरावे सादर केले गेले नाहीत. बॉम्बस्फोटांचा कट रचणाऱ्या आरोपींचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपास अधिकाऱ्यांकडे नव्हते. ही सारी कारणे पुढे करून उच्च न्यायालयाने ‘मोक्का’च्या विशेष न्यायालयाने दोषी ठरविलेल्या 12 आरोपींना आता निर्दोष सोडले आहे. त्यामुळे ‘एटीएस’ची व महाराष्ट्र सरकारची पूर्णपणे बेइज्जती झाली आहे. त्यांच्यावर नामुष्की ओढवली आहे.

11 जुलैच्या बॉम्बस्फोटप्रकरणी लष्कर-ए-तोयबाचा मोहम्मद फैजल हा पहिला आरोपी मीरा रोडमधून मुंबई क्राईम ब्रँचने पकडला. पूर्वाश्रमीचा सिमीचा कार्यकर्ता असलेल्या या आरोपीने रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेसाठी अर्थसहाय्य केले होते. या आरोपीला पकडल्यानंतर तपास ‘एटीएस’कडे सोपविण्यात आला. एटीएसने फैजलने दिलेल्या माहितीवरून दोन डझन आरोपींना अटक केली, परंतु घाईघाईत पुरावे गोळा केल्याने बऱ्याच त्रुटी राहील्या. बॉम्बस्फोटांचे खरे सूत्रधार हाती लागले नाहीत. पाकिस्तानात घातपाती कारवायांचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या आरोपींना पकडण्यात आले. परंतु त्यांचा कबुली जबाब कोर्टाने नाकारला. त्याचाच हादरा एटीएसला बसला. 19 वर्षे अटकेत असलेल्या आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडले. याला जबाबदार कोण? देश हादरुन सोडणाऱ्या या बॉम्बस्फोट मालिकेच्या वेळी के. पी. रघुवंशी हे एटीएसचे प्रमुख तर अनामी रॉय हे मुंबईचे आयुक्त होते. मीरा बोरवणकर या मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रमुख (सहपोलीस आयुक्त) होत्या. या अधिकाऱ्यांमधील श्रेयवाद मुळावर आला. ‘एटीएस’चा तपास भरकटला. त्यामुळे 11 जुलैच्या बॉम्बस्फोट मालिकेत जीव गमावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला नाही. त्यांचा आक्रोश सरकारला आज ना उद्या भोगावा लागेल, एवढे नक्की