
>> प्रभाकर पवार
व्हॉटस् ऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाच्या माध्यमांतून व्हायरल होणाऱ्या बऱ्या-वाईट गोष्टींचा दिवसेंदिवस इतका ताप वाढू लागला आहे की, सोशल मीडिया शाप की वरदान असा प्रश्न पडू लागला आहे. आपणास आलेल्या प्रत्येक ऑडिओ, व्हिडीओ व टेक्स्ट मेसेजची खरा की खोटा याची खातरजमा करावी लागत आहे. सोशल मीडियावर असणे ही आता प्रत्येकाची एक गरज बनली आहे, परंतु सत्य जाणून न घेतल्याने किंवा खातरजमा न केल्याने अनेकांची झोप उडत आहे. अलीकडे प्लॅस्टिक अंडय़ांनी तर मुंबईत धुमाकूळ घातला होता. बाजारात प्लॅस्टिक अंडी, चायनीज अंडी विकली जात असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. मुंबईच्या चारकोप पोलीसांना तर एका नगरसेविकेने रस्त्यावर अंडी विकणाऱया फेरीवाल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. संतप्त नागरिकांना शांत करण्यासाठी गुन्हा दाखल झाला. चारकोप पोलिसांनी फेरीवाल्याकडील सर्व अंडी जप्त करून ती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वांद्रे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविली. परंतु फूड ऍण्ड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशनचा रिपोर्ट Nil आला. The Sample dose not contain any Plastic Material. अंडय़ांमध्ये प्लॅस्टिकचा कोणताच अंश नाही, असा अहवाल अन्न औषध व प्रशासनाचे अधिकारी (Laboratory) अरविंद झळके यांनी पोलिसांना दिला. त्यानंतर National Egg Co-ordination Commitee (Necc) च्या पदाधिकाऱयांनी पत्रकार परिषद घेऊन प्लॅस्टिकचे अंडे दाखवा आणि 1 हजार रुपये मिळवा, असे जाहीर आवाहनच केले. त्यानंतर बाजारात कुठे प्लॅस्टिकची अंडी विकली जातात असा कुणी कुणाला व्हिडीओ फॉरवर्ड केल्याचे ऐकण्यात आले नाही. परंतु गेल्या महिनाभरात मुंबई, ठाणे, वसई, नालासोपारा आदी भागांत प्लॅस्टिक अंडी विकली जातात व ती आरोग्याला धोकादायक आहेत. त्याने कॅन्सर होतो असा प्रसार व प्रकार झाल्याने रोज अंडी खाणारे भयभीत झाले होते; परंतु पोलिसांनी एफडीए व अंडी विक्रेत्या संघटनांनी योग्य वेळी खुलासा केल्याने अंडी विकणारे वाचले. नाही तर त्यांनाही Linching ला सामोरे जाण्याचा धोका निर्माण झाला होता.
नवीन पिल्लू तयार होताना अंडय़ामध्ये त्या पिलाभोवती संरक्षणासाठी पापुद्रा तयार होतो. तो पापुद्रा म्हणजे काहींना प्लॅस्टिकचा वाटतो. अंडी उकडून फ्रिजमध्ये ठेवल्याने किंवा अंडे नासल्याने त्यास कधी कधी वास येतो. त्यामुळे अंडे बनावट असल्याचा काहींचा समज होतो; परंतु ते साफ खोटे आहे. बनावट किंवा प्लॅस्टिकचे अंडे बनविणे सोपे किंवा परवडणारेही नाही. तेव्हा लोकांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओंवर विश्वास ठेवू नये. तक्रार असल्यास आमच्याशी 1800222365 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
अंडी प्लॅस्टिकची नसल्याचा खुलासा एफडीएने केला; परंतु दुधातील भेसळीचे काय? ती अजूनही थांबवली जात नाही. उलट त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अगदी लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत लोकांच्या जिवांशी खेळले जाते आहे. दुधात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे; परंतु त्याचा आज कुणीही युद्धपातळीवर विचार करीत नाही. दूध टिकून राहण्यासाठी खाण्याचा, धुण्याचा सोडा, कपडय़ांची पावडर, युरिया इत्यादी पदार्थ मिसळले जातात. तसेच साखर, लॅक्टोज, ग्लुकोज, पीठ व मैदा अशा प्रकारचे स्टार्च, मीठ, स्कीम मिल्क आणि पावडरची भेसळ करण्यात येते. दूध टिकून राहण्यासाठी ग्रामीण भागातही अशा पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. मूत्रपिंड, हृदय व यकृतसाररखे अवयव निकामी होतात. भेसळयुक्त दुधाचे नियमित सेवन केल्यास क्षयरोगही होतो. लहान मुलांच्या शरीरवाढीवर परिणाम होतो. त्याची वाढ खुंटते. दुधातील वेगवेगळय़ा भेसळयुक्त पदार्थांमुळे रक्तदाब व हृदयविकारासारखे आजार जडतात. आपल्या देशात 65 टक्के लोक भेसळीचे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात. तेव्हा भेसळयुक्त पदार्थ ओळखण्यासाठी आता देशभरात जनजागृती झाली पाहिजे. शंका आल्यास दूध प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले पाहिजे; परंतु आपल्याकडे दूध भेसळीविरुद्ध कुणीही आवाज उठवताना दिसत नाही. ही शोकांतिका आहे. आज क्षयरोग, कर्करोग वाढण्याची कारणे काय आहेत याचा जर आपण गंभीरपणे विचार केला तर आपण रोज खात असलेले विषारी अन्नपदार्थच त्यास कारणीभूत आहेत. अगदी मिरची, लोणच्यापासून ते किमती स्कॉचपर्यंत सर्वच आज बाजारात बनावट मिळत आहे. गंधक, रासायनिक खते टाकून शेती पिकवली जात आहे. सेंद्रिय खते टाकून नैसर्गिक शेती केल्यास हा देश खऱया अर्थाने सुजलाम् सुफलाम् होईल. लोक आरोग्यदायक होतील; परंतु आता लोकांनी निसर्गाचाच विध्वंस करायचे ठरविले आहे. पर्यावरणाचा ऱहास सुरू केला आहे. तेव्हा पुढील पिढीचे आता काही खरे नाही. मुंबईसारख्या प्रगत शहरात आजही हैदराबादच्या मद्रासी टोळय़ा झोपडपट्टय़ांमध्ये रोज पहाटे भेसळीचे दूध घरोघरी पोहोचवून विकत आहेत. पोलीस त्यांना अधूनमधून पकडतात; परंतु तरीही त्यांचा नायनाट होत नाही. माणूसच माणसाच्या जिवाशी खेळत आहे. तेव्हा जनहो, सावधान! आपल्या घरी येणाऱया पिशव्या शुद्ध दुधाच्या की भेसळीच्या या ओळखायला शिका. नाही तर कोणत्या व्याधी कुणाला कधी जडतील याच नेम नाही. विशेषतः लहान बालकांना सांभाळा. ते मूल खरंच दूध पित आहे की, युरिया, धुण्याचा सोडा, कपडय़ांची पावडर इत्यादी पदार्थ मिश्रीत दूध पीत आहे. तेव्हा दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेप नव्हे तर थेट आता फाशीच दिली पाहिजे. पोलिसांची, कायद्याची कुणाला भीती राहिलेली नाही. त्यामुळेच आज आपण रोज दुधातून विष पित आहोत.
































































