पोलीस डायरी: पोलीस मार खात आहेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रभाकर पवार । मुंबई

अखेर 2018 साल एकदाचे संपले! या वर्षभरात पोलिसांनी जितका मार खाल्ला तितका कुणी नाही. कश्मीरात घरातून, रस्त्यातून पोलिसांचे अपहरण करून हत्या हा तर नित्याचाच प्रकार झाला आहे. लष्करी अधिकारी व जवानांनाही तेथे टार्गेट केले जात आहे. त्यांच्या गाड्यांवर, त्यांच्यावर दगडफेक करून समाजकंटकांनी लष्कराला भयभीत करून सोडले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांचीही स्थिती फार काही चांगली नाही.

गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात नागपूरच्या चंद्रपूर जिह्यातील नागभीड पोलीस ठाण्याचे तरुण फौजदार छत्रपती चिडे यांची दारूची तस्करी करणाऱ्या लीकर माफियांनी हत्या केली. दारूबंदी असताना दारूची वाहतूक करणाऱ्या माफियांविरुद्ध छत्रपती चिडे यांनी तीक्र मोहीम उभारली होती. त्यामुळे चिडलेल्या लीकर माफियांनी छत्रपती चिडे हे आपल्या हद्दीत गस्त घालीत असताना त्यांच्या अंगावर स्कॉर्पिओ गाडी घालून त्यांना चिरडून ठार मारले.

नोव्हेंबरच्या महाराष्ट्रातील या गंभीर घटनेनंतर उत्तर प्रदेशातील बुलंद शहर येथे डिसेंबरमध्ये जमावाला पांगवत असताना पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांना प्रथम त्यांच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून घेऊन त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. त्यानंतर कुऱहाडीने वार करून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

ही घटना ताजी असतानाच गेल्या आठवडय़ात उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे सुरेश वत्स या पोलिसाला जमावाने दगडाने ठेचून ठार मारले. या गंभीर घटनेनंतर पोलिसांवरील हल्ल्यात गुंड टोळय़ांचा सक्रिय सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

मुंबईच्या खार येथील विलास शिंदे या वाहतूक पोलिसाच्या हत्येनंतर मुंबईच्या गावदेवी वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई सुनील कदम यांनाही आपले प्राण गमवावे लागले. कारवाई करीत असताना या कर्तव्यदक्ष पोलिसांना गुंड मोटारसायकलस्वारांनी हल्ला करून ठार मारले. त्यामुळे भविष्यात गुंडांचे राज्य येणार की काय अशी शंका वाटत आहे. कारण राजकीय पक्ष असो अथवा सामाजिक संघटना असोत, त्यांच्या आंदोलनात शिरून गुंड टोळ्या नासधूस करीत असल्याचे उघड झालेले आहे. मग ती भीमा-कोरेगावची दंगल असो की मराठा महासंघाचे आंदोलन असो अथवा बुलंद शहर किंवा गाजियाबाद!

आपल्या देशात आंदोलने व हिंसाचार जसा वाढला आहे तशा आगीही वाढल्या आहेत हा फारच चिंतेचा विषय आहे. प्रत्येक भीषण आगीत शॉर्टसर्किटचे प्राथमिक कारण सांगितले जाते, परंतु सीरियल आगीचा हा प्रकार फारच संशयास्पद वाटत असून याचा आता गांभीर्याने विचार करायची वेळ येऊन ठेपली आहे. राज्यकर्त्यांनी मनावर घ्यावे. घातपाताची शक्यता नक्कीच आहे.

महाराष्ट्रासह देशभरात पोलिसांवरील वाढते हल्ले व आंदोलने पाहता मुंबई पोलिसांनी मात्र आपला लौकिक आजही कायम ठेवला आहे. ताडदेवचा वाहतूक शिपाई सुनील कदम यांच्या हत्येचा अपवाद वगळता मुंबई पोलीस व क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी गुंड टोळ्यांचे गेल्या वर्षभरात कंबरडे मोडले आहे. गेल्या वर्षीच्या 1 जानेवारी रोजी पुण्यातील भीमा-कोरेगाव येथे उसळलेल्या दंगलीनंतर त्याचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्रात उमटले. आरोपींना अटक व्हावी या मागणीसाठी मुंबईसह महाराष्ट्रात दलित बांधवांनी बंद पाळला. शेतकऱ्यांनी शेतमालाला भाव मिळावा म्हणून तर मराठा समाजाने आरक्षणासाठी भव्य असे मोर्चे काढले. अशा वेळी मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान होते, परंतु मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर व सध्याचे सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनी ते यशस्वीरीत्या पेलले. कायदा आणि सुव्यवस्था अगदी चोखपणे सांभाळली. मुंबई क्राइम ब्रँचचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे हेही कुठे कमी पडले नाहीत. मुंबई क्राइम ब्रँचची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील मरगळ प्रथम झटकून टाकली आणि कामाला सुरुवात केली.

बऱ्याच अनडिटेक्ट केसेस डिटेक्ट केल्या, खंडणीसाठी धमकावणाऱ्या अनेक गुंड टोळय़ांना गजाआड केले. त्यामुळेच मुंबईतील व्यापारी, बिल्डर, हॉटेल मालक आदी व्यावसायिक निर्धास्त झाले. मुंबईचे शांत स्वभावाचे तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलिसांचा गाडा सुरळीत चालला असतानाच मुंबई पोलिसांना एक जबरदस्त हादरा बसला. ज्यांनी मुंबई क्राइम ब्रँचचे सहपोलीस आयुक्त म्हणून पावणेचार वर्षे धुरा वाहिली, सर्वाधिक केसेस डिटेक्ट केल्या, एटीएसचे प्रमुख म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती ते धडाडीचे आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांचे वयाच्या 55 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या स्पर्धेतील हा दिलखुलास अधिकारी अकाली हे जग सोडून गेल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. महाराष्ट्र पोलिसांचे झालेले हे नुकसान न भरून येण्यासारखे आहे.

मुंबई शहरातील गँगवॉर संपुष्टात आल्याने मुंबईतील शूटआऊटच्या घटनाही थंडावल्या आहेत. किंबहुना गँगस्टरच्या अटका-सुटका वाढल्या आहेत. त्यामुळेच मुंबईत आज शांतता आहे याचे श्रेय खचितच मुंबई पोलिसांना जाते. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जायसवाल यांनी शांतपणे पोलीस दलावर आपली पकड मजबूत केली असून येत्या फेब्रुवारीअखेरीस दत्ता पडसलगीकर पायउतार झाल्यानंतर त्यांच्या जागेवर सुबोध कुमार जायसवाल यांची पोलीस महासंचालक म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. असो. 2018 साल मुंबई पोलिसांसाठी काही अपवाद वगळता चांगले गेले. परंतु मुंबईसह देशभरातील पोलिसांवरील वाढते हल्ले ही खचितच चिंतनीय बाब असून पोलिसांना जीवे ठार मारणाऱ्यांना तत्काळ फाशी व्हावी यासाठी आता कडक कायदे करण्याची गरज आहे. नाहीतर ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसी ब्रीदवाक्याला काहीही अर्थ राहणार नाही.