
पंजाब ऍण्ड महाराष्ट्र (पीएमसी) बँकेतील 4 हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर त्याच बँकेचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष, अधिकारी यांच्यासह कर्ज घेऊन बँकेला डुबविणारे एचडीआयएलचे मालक राकेश वाधवान, सारंग वाधवान अशा दोन डझन आरोपींना मुंबई क्राइम ब्रँचच्या पथकाने अटक केली. गेल्या सहा महिन्यांपासून पीएमसी बँक घोटाळय़ाचा तपास सुरू असून या घोटाळय़ात सामील असलेल्या संशयितांची चौकशी चालू असतानाच येस बँकेचा घोटाळा समोर आला आहे. येस बँकेतर्फे 30 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले गेले होते. त्यातील 20 हजार कोटी रुपयांचे कर्ज बोगस कागदपत्रे सादर करून मिळविण्यात आले असल्याचे तपासात उघड झाले आहे. या घोटाळय़ाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱयांनी येस बँकेचा संस्थापक राणा कपूर यास अटक केली आहे. येस बँकेचा सीईओ असताना राणा कपूरने 30 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. त्यातील 20 हजार कोटी रुपयांची कर्जे बोगस आहेत. राणा कपूरनेच बोगस कंपन्या स्थापन करून आपल्या कुटुंबीयांच्या नावे कोटय़वधी रुपयांचे कर्ज उकळून प्रचंड मालमत्ता देश-परदेशात उभारली आहे. पीएमसी बँक घोटय़ाळय़ात सामील असलेल्या वाधवानलाही राणा कपूरने कोटय़वधी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. कपूर कुटुंबीयांच्या नावे 78 कंपन्या आहेत. बँकेची व गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱया राणा कपूर, त्याची पत्नी व मुलींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे हे बेईमान कुटुंब मुंबईच्या वरळी येथील समुद्र महल या अत्यंत प्रसिद्ध हाऊसिंग सोसायटीमध्ये Luxurious जीवन जगत असतानाच त्यांची काळी कृत्ये बाहेर आली.
राणा कपूर (65) हा दिल्लीचा असून त्याला पत्नी, तीन मुली आहेत. 2004 साली येस या खासगी बँकेची अशोक कपूर, राणा कपूर यांनी स्थापना केली. अशोक कपूर हे ‘26/11’च्या हल्ल्यात बळी पडले. त्यानंतर राणाला रान मोकळे मिळाले. राजकारण्यांच्या, सत्ताधाऱयांच्या मदतीने त्याने आपले दिल्ली, मुंबईसह देश व परदेशात साम्राज्य उभे केले. राजकीय पुढाऱयांच्या कॉर्पोरेट कंपन्यांना कर्ज देऊन आपल्या कुटुंबीयांच्या नावे कोटय़वधी रुपयांचे कमिशन मिळविले. राजकीय संबंध असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने कपूरच्या मनमानीला चाप लावला नाही. काही बँक अधिकाऱयांनी आपल्या नोकऱया जाऊ नयेत म्हणून दुर्लक्ष केले, परंतु या सर्व भ्रष्टाचाराला तेही जबाबदार आहेत. कारण आज हजारो गुंतवणूकदार, खातेदार रस्त्यावर आले आहेत. राणा कपूरच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत आहेत. काहींना हृदयविकाराचा झटका आला आहे, काहींना बँकेत पैसे अडकून पडल्यामुळे व परत मिळण्याची खात्री नसल्याने झोप लागत नाही. जे पीएमसी बँकेच्या खातेदारांचे, गुंतवणूकदारांचे सहा महिन्यांपूर्वी झाले तेच येस बँकेचे झाले. खातेदार कंगाल झाले. तेव्हा आता विश्वास कुणावर ठेवावा? आपली कष्टाची, पगाराची रक्कम कुठे सुरक्षित ठेवावी? घरात ठेवली तर चोर-दरोडेखोर लुटून घेऊन जातात. मग आता लोकांनी करायचे तरी काय असा प्रश्न या देशातील तमाम जनतेला पडला आहे. ‘आरबीआय’चा जर अशा खासगी बँकांवर अंकुश नसेल तर रिझर्व्ह बँक हवी कशाला?
हर्षद मेहताने केले तेच नीरव मोदीने केले. नीरव मोदी, विजय मल्ल्या, जिग्नेश शहा, केतन पारेख आदी व्यापाऱयांनी देशाला लुटले. गुंतवणूकदारांना, बचत करणाऱया खातेदारांना देशोधडीला लावले. अशा या हृदयशून्य, नीतिभ्रष्ट, रक्तपिपासू आरोपींना चाबकाने फोडले पाहिजे. असे धाय मोकलून रडणाऱया गुंतवणूकदारांकडे पाहिल्यानंतर वाटते. बरं बँकांच्या पैशातून नीरव मोदी, राणा कपूरसारखे पापी वरळी समुद्रकिनारी असणाऱया अत्यंत पॉश म्हणून ओळखल्या जाणाऱया ‘समुद्र महल’ या सोसायटीमध्ये राहत होते. बँकांना फसवून नीरव मोदी व किंगफिशरचा मालक विजय मल्ल्या परदेशात पळाले. विजय मल्ल्याही ‘समुद्र महल’मध्येच राहत होता. नीरव मोदी, विजय मल्ल्या पळाल्यानंतर राणा कपूरही परदेशात पळण्याच्या प्रयत्नात होता, परंतु त्याची मुलगी मुंबई विमानतळावर पकडली गेल्यामुळे राणाचा प्रयत्न फसला आणि त्याला जेलमध्ये जावे लागले. वास्तविक ‘समुद्र महल’ ज्या वरळीच्या समुद्रकिनारी वसले आहे ती प्रॉपर्टी ग्वाल्हेरच्या सिंदीया कुटुंबीयांची होती; परंतु त्यांनी ती विकली. आजही समुद्र महलमध्ये सिंदीया कुटुंबीयांचे आलिशान फ्लॅट तेथे आहेत. समुद्र महल या इमारतीमध्ये जर कुणाला फ्लॅट घ्यायचा असेल तर तेथे 1 लाख 25 हजार रुपये (चौ. फूट क्षेत्रफळ) रेट आहे. जगात इतक्या महागडा चौ. फुटाचा फ्लॅट कुठेच नाही. यावरून ज्या समुद्र महल सोसायटीमध्ये चांगले, सुशिक्षित, नामांकित व्यक्ती राहतात तशाच अत्यंत बदनाम, दुर्गुणी व्यक्तीही राहतात. त्यामुळेच अलीकडे समुद्र महल इमारतीमध्ये दोन-चार दिवसांनी सीबीआय, ईडी, केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकाऱयांच्या धाडी पडत असतात. 28 माळय़ांच्या ए व बी विंगमध्ये आलिशान असे 85 फ्लॅट दोन एकर जागेत आहेत. परंतु नीरव मोदी, विजय मल्ल्या व आता राणा कपूर यांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणल्यामुळे ग्वाल्हेरच्या सिंदीया कुटुंबीयांची ही मालमत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या सोसायटीमध्ये आणखी किती राणा आहेत, समुद्र महल नक्की कुणाचे आहे? हे सामान्यांना कळणार नाही.

































































