खाकी वर्दीतील माणुसकी; कोरोनाने खच्ची झालेले लोकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकात दहशतवादी कारवायांचा मुकाबला करीत असतानाच सोशल  मीडियाच्या माध्यमातून कोविडच्या विरोधात जनजागृती करणारा पोलीस अधिकारी पुढे आला आला आहे. कोरोना काळात लोकांचे खच्ची झालेले मनोबल वाढवण्याचा प्रयत्न समाजमाध्यमातून या अधिकाऱयाचा सुरू आहे.

कोरोनाविरुद्धच्या युद्धात सरकारी पातळीपासून स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांसह असंख्य सर्वसामान्य लोक जनजागृतीचे काम करीत असून त्यामध्ये  पोलीस दलाच्या दहशतवादविरोधी पथकाच्या चारकोप युनिटचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांचाही समावेश आहे. दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्याबरोबरच अमली पदार्थ, बनावट चलन अशी विविध कामे या पथकाकडे आहेत. पोलिसांप्रमाणे सर्वसामान्य लोकांशी या युनिटचा थेट संबंध येत नाही. पण सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सोशल मीडियातून या युनिटचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी कोरोनाच्या विरोधात सतत जनजागृतीचे काम केले.

कोरोनाची लक्षणे कोणती, चाचण्यांचे महत्त्व, त्वरित उपचार, ऑक्सिजन पातळी वगैरेवर लिखाण सुरू केले. वाघ मूळचे नगर जिह्यातले. या जिह्यात कोविडच्या केसेस वाढल्या तेव्हा ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली. आता कोरोनाच्या दुसऱया लाटेतही जमेल तशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना धैर्य देण्याचे काम सुरू आहे.

मागील वर्षी मे महिन्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. 15 दिवस सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची लागण झाली. त्यावरही सकारात्मकतेने मात केली. पुढे त्यांचे आई-वडील व कालांतराने सासू-सासरे यांनाही कोरोनाची लागण झाली. या सर्वांना गावावरून मुंबईत उपचारांसाठी आणले आणि उपचार झाल्यावर त्यांना गावी पाठवून दिले. त्यानंतर मात्र वाघ यांनी कोविडबाबत सोशल मीडियावर मराठी व इंग्रजी भाषेत लेख लिहून जनजागृती सुरू केली.