
सामना प्रतिनिधी, धुळे
शहर आणि जिल्ह्यात चोरटे सक्रीय झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चोरट्यांनी संधी साधत पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. या चोऱ्यांची पोलीस दप्तरी नोंद होऊन तपासाला सुरुवात होत नाही तोच शनिवारी सकाळी देवपुरातील नकाणे रोडवर मंगलपोत ओरबाडण्यात आली. तर शनिवारी कुमार नगरातील सेंट्रल बँकेच्या शेजारील घरात चोरट्यांनी हात साफ केला. मंगळसूत्र ओरबाडण्याचा गुन्हा देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात तर कुमार नगरातील चोरीचा गुन्हा शहर पोलिसांत नोंदविण्यात आला आहे.
धुळे शहरात सलग तीन दिवसांपासून दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. शिरपूर येथील गणेश कॉलनीत राहणाऱ्या शोभा दत्तात्रय नेरकर शनिवारी सकाळी धुळ्यात आल्या. देवपुरातील नातेवाईकांकडे जात असताना शारदा नेत्रालयासमोर दुचाकीवर आलेल्या तिघांनी नेरकर यांच्या गळय़ातील चार तोळे सोन्याची मंगळसूत्र लांबवले. चोरटे पल्सर या दुचाकीवर असून ते सुमारे 25 ते 30 वर्षे वयोगटातील असा अंदाज आहे.
धुळे शहरासह तालुक्यातील मोठय़ा गावांमध्ये दुकानांसह निरनिराळय़ा ठिकाणी चोऱयांच्या घटनांमध्ये सातत्य दिसून येत आहे. शनिवारी रात्री साक्रीरोडलगत असलेल्या कुमारनगर भागातील सेंट्रल बँकेच्या शेजारील रहिवासी आर.व्ही.पाटील यांच्या घरी चोरटय़ांनी हातसफाई केली. हिराबाई रमेश पाटील यांनी सांगितले की, शनिवारी रात्री माझे पती दोन वाजेपर्यंत रेडिओ ऐकत होते. ते झोपी गेल्यानंतर चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटाची तिजोरी फोडून 40 हजार रुपये रोख, 10 तोळे सोन्याचा चपला हार, मंगळसूत्र, अंगठी तसेच 4 साड्या, 4 ड्रेस यासह इतर वस्तू लांबविल्या.



























































