घरासाठी जमा केलेले दहा लाख रस्त्यात पडले, पोलिसांनी तासाभरात मिळवून दिले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

काळबादेवी येथे राहणाऱ्या गोईल दांपत्याला विद्याविहार येथे घर घ्यायचे असल्याने दहा लाखांची रोकड बिल्डरला त्यांना द्यायची होती. ही रक्कम घेऊन दोघे पती-पत्नी त्यांच्या दुचाकीवरून निघाले, पण भेंडीबाजार परिसरात पैसे असलेली पर्स रस्त्यात कुठे तरी पडली. पुढे गेल्यानंतर पर्स पडल्याचे लक्षात येताच त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी लगेच शोधमोहीम राबवून तासाभरात महिलेला तिची नऊ लाख 50 हजारांची रोकड, मोबाईल व कागदपत्रे असलेली पर्स परत मिळवून दिली.

रक्षा गोईल व त्यांचे पती यांना आज विद्याविहार येथे जाऊन बिल्डरला साडेनऊ लाखांचा हप्ता द्यायचा होता. त्यानुसार दोघे पती-पत्नी त्यांच्या ऍक्टिव्हा दुचाकीवरून काळबादेवी येथून निघाले. रक्षा यांनी पैसे, मोबाईल व कागदपत्रे असलेली पर्स दोघांच्या मध्ये ठेवली होती, पण भेंडीबाजार परिसरात आल्यानंतर पावसामुळे त्यांची पर्स रस्त्यात कुठे पडली हे त्यांना समजलेच नाही. पुढे गेल्यानंतर पर्स नसल्याचे रक्षा यांच्या लक्षात आले. त्यांनी मागे जाऊन शोधाशोध केली पण काही फायदा झाला नाही. त्यामुळे त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाणे गाठून पर्स पडल्याची तक्रार दिली. हा प्रकार कळताच एपीआय फरीद खान, उपनिरीक्षक सचिन ढगे, हरीश शिळमकर व पथकाने पर्सचा शोध सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा एका फुटेजमध्ये एक सायकलस्वार ती पर्स उचलून जाताना दिसला.

बेकरीत मिळाली पर्स
तो सायकलवाला बेकरीत काम करणारा होता. त्यामुळे पोलिसांनी बेकरीकडे मोर्चा वळवला. दोन बेकऱया तपासल्यानंतर तिसऱया बेकरीत तो सायकलवाला भेटला. पोलिसांनी त्याच्याकडून ती पर्स ताब्यात घेतली. पर्समधील पैसे, मोबाईल व कागदपत्रे जैसे थे होती. त्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांनी तो सर्व मुद्देमाल गोईल दांपत्याच्या स्वाधीन केला.