
सामना प्रतिनिधी, मुंबई
कॉलरवरच्या लेबलवरून 27 दिवसांपासून बेवारस असलेल्या मृतदेहाची अंधेरी रेल्वे पोलिसांनी ओळख पटवली. राम सोमा नाईक असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या अंत्यविधीकरिता नातेवाईकांना पोलिसांनी आर्थिक मदतदेखील केली.
मूळचा पेणचा रहिवासी असलेला राम हा नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. 26 जूनला पहाटे अंधेरी-जोगेश्वरीदरम्यान रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला. पोलिसांनी पंचनामा करून रामचा मृतदेह कूपर रुग्णालयात ठेवला. प्रभारी पोलीस निरीक्षक भारत चौधरी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक जयश्री मूलगीर, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुंभार, पोलीस हवालदार सुधीर म्हापदी यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करून अखेर रामच्या नातेवाईकांना शोधून काढले.
असे शोधले नातेवाईकांना
घटनास्थळी पोलिसांना रामची ओळख पटेल असे काहीच मिळाले नव्हते. त्यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण होते. पोलिसांनी रामचा रक्ताने माखलेला शर्ट नीट निरखून पहिला. शर्टाच्या कॉलरवर ‘महेश टेलर, रोहा’ असे लेबल होते. त्या लेबलवरून पोलिसांनी रामच्या टेलरशी संपर्क साधला. पोलिसांचे पथक रोहय़ाला गेले पण त्या टेलरने त्या प्रकारचे लेबल पाच वर्षांपूर्वीच वापरणे बंद केले होते. तसेच मृत व्यक्तीला ओळखत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. शेवटचा पर्याय म्हणून तपासी अधिकाऱयांचे पथक रोहा पोलीस ठाण्यात गेले. तेथे चौकशी केल्यावर राम हा बेपता असल्याची तक्रार नातेवाईकांनी जून महिन्यात केली होती. त्याआधारे पोलिसांचे पथक एका वीटभट्टी मालकापर्यंत पोहचले. चौकशीत त्या वीटभट्टी मालकाने राम हा पूर्वी कामाला असल्याची कबुली दिली.
अंत्यविधीकरिता केली आर्थिक मदत
वीटभट्टी मालकाच्या चौकशीनंतर नातेवाईकांचा शोध घेण्याकरिता पोलीस अलिबागला गेले. तेथे एका शेतात रामचे नातेवाईक मजुरीचे काम करत होते. त्यांना रामच्या अपघाती मृत्यूची माहिती दिली. नातेवाईकाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. अंत्यविधीकरिता मुंबईत येण्याकरितादेखील त्याच्याकडे पैसे नव्हते. अखेर अंधेरी रेल्वे पोलिसांनी काही पैसे जमवून रामच्या नातेवाईकांना मुंबईत आणले. गुरुवारी नातेवाईकांनी रामवर अंत्यसंस्कार केले.


























































