ओशो आश्रमात गोंधळ; अनुयायांवर पोलिसांचा लाठीचार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओशो आश्रमातील व्यवस्थापन आणि शिष्यांच्या गटात सुरु असलेल्या वादातून एकाने व्हिडिओ रेकॉडिंगसह आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याला अडवून विचारपूस केली असता, संबंधिताने धिंगाणा घातल्यामुळे पोलिसांनी त्याला लाठीने मारहाण केली. त्यानंतर दोन ते तीन अनुनायी पोलिसांच्या अंगावर धावून गेल्यामुळे पोलिसांनी त्यांना चोप देऊन प्रवेशद्वाराबाहेरील जमाव पांगविल्याची घटना बुधवारी कोरेगाव पार्कमध्ये घडली.

ओशो आश्रमाचे व्यवस्थापन आणि शिष्यांच्या एका गटात वाद सुरू आहे. अनुयायांना आश्रमात येण्यास प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यावेळी अनुयायी ओशो आश्रम परिसरातील प्रवेशद्वारासमोर जमल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यापार्श्वभूमीवर त्याठिकाणी   पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.त्यावेळी एकाकडून व्हिडिओ रेकॉर्ड करीत त्याने धिंगाणा घातला. त्यामुळे पोलिसांनी त्याला चोप दिला. त्याचवेळी काही अनुयायांनी पोलिसांशी वाद घालत त्यांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा पोलिसांनी  आश्रमासमोर जमलेल्या दोघा तिघांवर सौम्य लाठीचार्ज केला. दरम्यान,  आम्ही शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मंगळवारी अनुयायांना आत प्रवेश दिला होता. मात्र, बुधवारी व्यवस्थापनाने पोलिसांना हाताशी धरुन बळाचा वापर केला, असा आरोप अनुयायांनी केला.

एकाने परिसरातील व्हिडिओ शुटिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अडविल्याने धिंगाणा घातला. जमिनीवर पडून पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे दोघे कर्मचारी जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.