आचारसंहितेच्या नावाखाली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा सराफा व्यापार्‍यावर दरोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा नावाखाली उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या चार कर्मचाऱ्यांनी सराफा व्यापार्‍यावर दरोडा टाकला. तब्बल दीड लाख रुपये व्यापाऱ्याकडून काढून घेतले व त्यासाठी चार तास एका दुकानात बसून ठेवण्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणाची तक्रार संबंधित व्यापाऱ्यांनी थेट विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उदगीर शहरातील सराफ लाईन भागात सचिन बालाजी चन्नावार यांचे ‘श्री बालाजी ज्वेलर्स’ हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. रात्री साडेआठ वाजता दुकान बंद करून दुकानात जमलेली रोख रक्कम सहा लाख रुपये घेऊन ते आपल्या घराकडे जात होते. ऊदगीर शहर पोलीस ठाण्यातील पोलrस कर्मचारी श्रीहरी डावरगावे, महेश खेळगे, बडे, रमेश बिरले यांनी त्यांना अडवले. शिवाजी चौकातून शाहू चौकाकडे घेऊन जाऊन तेथील एका दुकानांमध्ये त्यांना बसवण्यात आले. सहा लाख रुपये जप्त करायचे आहेत असे सांगून चार तासानंतर तब्बल दीड लाख रुपये काढून घेऊन उर्वरित रक्कम त्यांना सोपवली व सोडून देण्यात आले.

सचिन बालाजी चन्नावार यांनी या घटनेची तक्रार थेट विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली असून संबंधितावर कारवाई करावी व आपली रक्कम आपल्याला परत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. या घटनेने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांची दरोडेखोरी उघडकीस आल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.