ड्रग्जमाफियांसोबत हातमिळवणी करणाऱ्या पोलिसाला बडतर्फ करणार

राज्यात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीचे प्रमाण वाढत असून ड्रग्जमाफियांना पोलिसांचीही मदत मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. हा मुद्दा आज विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला. त्यावर ड्रग्जमाफियांशी कोणत्याही प्रकारचे कनेक्शन आढळले तर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. कलम 311 अन्वये तातडीने सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश गृहविभागाला देण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

आमदार अनिकेत तटकरे यांनी यासंदर्भातील मुद्दा मांडला होता. खोपोलीत 70 ते 80 किलो एमडी पावडर जप्त झाल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राज्यांतील गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांची बैठक घेतली होती. त्यात ड्रग्जतस्करीचे नेटवर्क मोडून काढण्याबाबत सखोल चर्चा झाली. तसे निर्देश राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्यात पोलीस विभागातर्फे ड्रग्जविरोधात लढाई सुरू असून ती बराच काळ चालेल. अनेकदा बाहेरील राज्यांतील पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. त्यांना मिळालेल्या ‘इंटेलिजन्स’च्या आधारावर ती कारवाई होते. मात्र बहुतांश प्रकरणात त्याची स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना देण्यात येते, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

बंद कारखान्यांच्या ठिकाणी छापे

काही प्रकरणांमध्ये बंद कारखान्यांमध्ये अमली पदार्थ तयार करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळेच विशेषतः संभाजीनगर, रायगड, नाशिक, पुणे या भागांतील बंद कारखान्यांत हालचाल आढळल्यास तेथे छापे टाकण्याची कारवाई सुरू आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.