
उत्तर प्रदेशातील कीडगंज परिसरात देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका महिला आयएएस (IAS) अधिकाऱ्याच्या घरात हे रॅकेट सुरू असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेतले आहे. तसेच यांच्याजोडीला पाच तरुण आणि चार तरुणींना देखील ताब्यात घेतले आहे. सर्वेश द्विवेदी नावाच्या व्यक्तीने तीन महिन्यांपूर्वी ही जागा आपल्या कुटुंबासह राहण्यासाठी 15 हजार रुपये प्रति महिना भाड्याने घेतली होती, मात्र त्याचा वापर अवैध कामांसाठी केला जात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेश द्विवेदीने सुरुवातीला घरमालक महिला अधिकाऱ्याचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्या कुटुंबाला तिथे ठेवले होते. मात्र, काही काळानंतर त्याने कुटुंबाला अतरसुइया येथील जुन्या घरी हलवले आणि भाड्याच्या घरात देहविक्रीचे रॅकेट सुरू केले. भाड्याचे घर घेताना करारात त्याने कुटुंबासोबत राहण्याचे आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात तिथे अवैध गोष्टी सुरू होत्या. तेथील स्थानिक रहिवाशांना रात्री उशिरा येणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या वावरामुळे संशय आला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी जेव्हा घरावर छापा टाकला, तेव्हा त्यांना आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पोलिसांनी घरफोडी करून घरात प्रवेश केला. त्यावेळी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चार मुली आणि चार तरुण आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. या मुलींपैकी एक पश्चिम बंगालची, एक वाराणसीची आणि दोन स्थानिक प्रयागराजच्या रहिवासी आहेत. तसेच अटकेत असलेले चारही तरुण स्थानिक आहेत. तर मुख्य सूत्रधार सर्वेश द्विवेदी घराबाहेर पाळत ठेवत असताना पोलिसांनी त्यांला अटक केली.
कीडगंजमधील स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या घरामुळे परिसरातील शांतता आणि वातावरण खराब होत होते. अनोळखी तरुण-तरुणींच्या सततच्या येण्या-जाण्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी सध्या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


























































