
महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातील सर्वेत्तम पोलीस दल असून ते जागतिक स्तरावर सर्वेत्तम ठरण्यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यात यावी, त्या माध्यमातून त्यांचे मनोबल वाढवण्यात यावे असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. येत्या रविवारी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्ताने कोल्हापूर येथे सारथीचे उपकेंद्र सुरू करण्यात येईल अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
साताऱयाच्या मल्हारपेठ पोलीस ठाणे व पोलीस वसाहत इमारतीच्या ई-भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले की, नागरिकांच्या घराचे आणि जिवाचे रक्षण पोलीस करतात, पण त्यांच्याच घरांचे संरक्षण होणार नसेल तर त्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होणे अत्यंत स्वाभाविक आहे. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी उत्तम दर्जाच्या आणि आधुनिक रंगसंगतीच्या पोलीस वसाहती निर्माण होणे आवश्यक आहे. पोलीस दलाच्या भावना आणि अडचणींशी मी सहमत आहे. त्यांच्या अपेक्षा प्रत्यक्षात उतरवणारे हे सरकार आहे. पोलीस स्टेशनशेजारीच पोलीस वसाहत इमारत असणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिसांच्या वेळेची आणि श्रमाची बचत होऊन कामाचा दर्जा उत्तम राहण्यास मदत होणार आहे. मल्हारपेठ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुन्हेगारांना जरब बसावी तर गोरगरीबांना आधार मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकांना पोलीस स्टेशनला येण्याची गरजच पडू नये इतकी इथली कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राहावी, असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमास गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई आणि सतेज पाटील, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसाळकर आदी उपस्थित होते.
पोलीस वसाहतींच्या कामाचा दर्जा उत्तम असावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मल्हारपेठ पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीसाठी जनतेला शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतींच्या ज्या कामाचे भूमिपूजन केले जाते त्या कामाचा दर्जा उत्तम राहावा आणि ती दिलेल्या वेळेत कामे पूर्ण व्हावीत. 1995 पासूनची मागणी या सरकारच्या काळात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पूर्ण होत आहे हा नियतीचा भाग असल्याचेही ते यावेळी म्हणाले. इमारत ही उत्तम रंगसंगतीची असावी. कामात सातत्य असावे अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी पोलीस गृहनिर्माण कामासाठी निधीची कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली.



























































