
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मोदी सरकारने जाहीर केलेल्या 2019च्या अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यातील बहुतांश प्रतिक्रिया या नकारात्मक आहेत. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेला अर्थसंकल्प आहे, असाच सूर अनेकांच्या प्रतिक्रियांमधून पाहायला मिळत आहे.
हा शेतकऱ्यांचा अपमान
अंतरिम अर्थसंकल्पातून मोदी सरकारने ‘किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचा अर्थ शेतकऱ्यांना दिवसाला 17 रुपये मिळणार आहेत. हा शेतकऱ्यांचा अपमानच नव्हे, तर त्यांची क्रूर थट्टाच आहे.
– राहुल गांधी, अध्यक्ष, काँग्रेस
इलेक्शन बजेट
मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पाचा परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीवर होणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाला ‘इलेक्शन बजेट’च म्हणावे लागेल. त्यातील घोषणांमागे निवडणुकीतील स्वार्थ दडलेला आहे.
– डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान
मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती वाढविणारा
अंतरिम अर्थसंकल्प हा विकासाकडे नेणारा, शेतकरी आणि गरीबांचे हित साधणारा आणि मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती वाढविणारा आहे.
– अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री
‘विश्वासघात’ नाटकाचा प्रवेश
यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे ‘विश्वासघात’ नाटकांच्या अंकातील फक्त एक प्रवेश आहे. जनताभिमुख अर्थसंकल्पाचे नाटक आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. निवडणुकीआधीचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे.
– डॉ. नीलम गोऱहे, शिवसेना आमदार
विध्वंसाची कबुली
मोदी सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ असा केलेला शब्दप्रयोग म्हणजे त्या सरकारने कृषी अर्थव्यवस्थेच्या केलेल्या विध्वंसाची कबुली आहे.
– पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र
हे खूप मोठे गाजर
मोदी सरकारने याआधी छोटी छोटी गाजरे वाटली. आता अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे खूप मोठे गाजर आहे. हे फसवे आहे. प्रत्येक वर्षी भाजप सरकार तीच तीच आश्वासने देत आले आहे.
– अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
दिल्लीचीही घोर निराशा
मोदी सरकारचा हा अखेरचा जुमला आहे. या अंतरिम अर्थसंकल्पाने दिल्लीचीही घोर निराशा केली आहे. केंद्राच्या महसुलात आमचा वाटा 325 कोटींचा आहे, पण राजधानीतील स्थानिक स्वराज्य संस्थांना ठेंगाच दाखवण्यात आला आहे. दिल्लीला स्वतःच्या पैशावर विसंबून राहावे लागत आहे.
– अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली
भांडवलदारांचे उखळ पांढरे
मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प हा निव्वळ जुमलेबाजी आहे. गेल्या पाच वर्षांत आर्थिक विषमता वाढली असून फक्त भांडवलदारांचे उखळ पांढरे झाले आहे. अशी जुमलेबाजी देशाचे भाग्य बदलू शकत नाही.
– मायावती, अध्यक्षा, बसपा
काँग्रेसच्याच योजनांची नक्कल
अर्थसंकल्पात काँग्रेसच्याच योजनांची नक्कल आणि पुनरुच्चार करण्यात आला आहे. देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर गरीबांचा हक्क आहे, हे मोदी सरकारने मान्य केले हे बरे झाले.
– पी. चिदंबरम, ज्येष्ठ काँग्रेस नेते
सरकारची स्टंटबाजी
निवडणूक जवळ आल्याने सरकारने अंदाजपत्रकातून स्टंट केलेला आहे. मागील निवडणुकीपूर्वी सरकारने अशीच आश्वासने दिली होती. केवळ घोषणा करायच्या, अंमलबजावणी मात्र काहीच नाही.
– अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक
मतदारांना ‘लाच’ देण्याचा हा प्रकार
निवडणुकीपूर्वी मतदारांना ‘लाच’ देण्याचा हा प्रकार आहे. पाच वर्षांत मोदी सरकारने काय केले, किती आश्वासने पूर्ण केली, त्यावर काहीच सांगितले जात नाही. 10 कोटी नोकऱ्या आणि 15 लाखांचे काय झाले?
– मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस गटनेते, लोकसभा
खोट्या घोषणांची नवी टोपली
मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे जुमल्यांच्या बाजारात खोटय़ा आणि फसव्या घोषणांची नवी टोपली आहे, पण जनतेला आता जुमले कळतात.
– लालूप्रसाद यादव, नेते, राष्ट्रीय जनता दल






























































