
सामना ऑनलाईन । कोलंबो
श्रीलंकेतील राजकीय संकट आता अधिकाधिक गडद होत चालले आहे. श्रीलंकेचे पदच्युत पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांचे विश्वासू समर्थक, माजी क्रिकेटपटू आणि पेट्रोलियममंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक करण्यात आली आहे. रविवारी रणतुंगा यांच्या सुरक्षारक्षकाने राजपक्षे यांच्या समर्थकांवर गोळीबार केला होता. ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते. पदच्युत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी संस्थगित संसदेचे कामकाज पुन्हा सुरू न झाल्यास देशात रक्तपात होईल असा गंभीर इशारा दिल्याने श्रीलंकेतील राजकीय संकट अधिकच गडद झाले आहे.
…तर रक्तपात होईल – विक्रमसिंघे
श्रीलंकेत सध्या राजपक्षे गटाने चालवलेली झुंडशाही आणि लोकशाहीचे दमन थांबले नाही तर देशात रक्तपाताच्या अप्रिय घटना घडतील आणि त्याला लोकशाही पायदळी तुडवून पंतप्रधानपदी विराजमान झालेले महिंदा राजपक्षे आणि त्यांचा पक्ष जबाबदार राहील, असा इशारा पदच्युत पंतप्रधान रान्नील विक्रमसिंघे यांनी दिल्याने श्रीलंकेतील राजकीय संकट अधिकच गडद झाले आहे.राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी संस्थगित केलेल्या संसदेचे कामकाज पुन्हा सुरू करावे, असेही आवाहन विक्रमसिंघे यांनी केले आहे.


























































