पुलाच्या नामकरणावरून विनाकारण राजकारण नको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या नामकरणाबाबत तिथल्या स्थानिकांची मागणी केवळ सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण केले. या पुलाला कोणाचे नाव द्यायचे यावरून विनाकारण कोणी राजकारण करू नये असे आवाहन शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे.

या उड्डाणपुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नामकरण करण्याची मागणी गेल्या वर्षी आपण केली होती, असा दावा खासदार मनोज कोटक यांनी केला आहे. या मागणीबाबत कुठेही फारशी वाच्यता न झाल्याने याबाबत आपल्याला माहिती नव्हती असे खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या नावाला कोणताही विरोध करण्याचा प्रश्नच नसल्याचेही शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे.

या पुलाला सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज (मोईनुद्दीन सूफी चिश्ती) यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आपणाकडे तेथील स्थानिक जनतेने केली आहे. तसेच स्थानिक नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी या पुलाला ‘वीर क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे’ यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. याशिवाय काही लोकप्रतिनिधींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव सदर पुलासाठी सुचविले आहे. या सर्व महापुरुषांविषयी आपल्याला नितांत आदर असल्याचे शेवाळे यांनी म्हटले आहे.

मात्र, केवळ स्वार्थासाठी या साऱया प्रकरणाबाबत गैरसमज निर्माण करून अतिशय हीन राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे, ही खेदाची बाब आहे. या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन समाजात असंतोषाचे वातावरण तयार करणाऱयांच्या स्वार्थी राजकारणाला जनता बळी पडणार नाही. याबाबतचा गैरसमज दूर करून एकत्रितपणे आपल्या समोर उभ्या असलेल्या कोरोना संकटाचा मुकाबला करूया, असे आवाहन खासदार शेवाळे यांनी केले आहे.