सपना चौधरीची बाऊन्सर पूनम पंडीतला तिकीटाची लॉटरी, काँग्रेसने दिली उमेदवारी

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी (UP Election 2022) सगळे पक्ष जोरात कामाला लागले आहेत. प्रचार रंगात यायला लागला असून राजकीय पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागा असून इथे विजय मिळवण्यासाठी समाजवादी पक्ष पूर्ण ताकद लावताना दिसतोय. भाजप आपली सत्ता टीकवण्यासाठी प्रयत्नशील आहे तर काँग्रेस पक्ष गतवैभव परत मिळावं यासाठी झगडतोय. काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत महिलांना प्राधान्य देणार असून 40 टक्के जागांवर महिलांना संधी देणार असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेसने पूनम पंडीत हिला देखील उमेदवारी दिली असून ती शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आली होती.

काँग्रेसने बुलंदशहरातील स्याना विधानसभा मतदारसंघातून पूनमला उमेदवारी दिली आहे. पूनम ही पूर्वी हरयाणाची गायिका आणि नर्तिका सपना चौधरी हिची बाऊन्सर होती. पूनम ही एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेमबाज आहे. तिने ग्रामीण युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावले होते. शेतकरी आंदोलनावेळी पूनमने मुलाखती देताना सांगितलं होतं की ती राजकारणात येऊ इच्छित नाही. मात्र यानंतर भाजपने पक्षात येण्यासाठी आपल्यावर बराच दबाव टाकला ज्यामुळे मी राजकारणात येण्याबाबत विचार करायला लागले असं पूनमने म्हटलं आहे. पूनम जिच्यासाठी बाऊन्सर म्हणून काम करायची ती सपना चौधरी ही भाजपमध्ये सामील झाली आहे. तिच्याशी तुझा संपर्क असतो का? असं विचारलं असता तिने यावर नकारार्थी उत्तर दिलं. शेतकरी आंदोलनातील भाषणांमुळे पूनम बरीच प्रसिद्ध झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षप्रवेशाच्या अवघ्या 3 महिन्यांच्या आत उमेदवारी पूनमला उमेदवारी मिळाली आहे. ती ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे त्या स्याना मतदारसंघात 2012 च्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला होता. 2017ला ही जागा भाजपने जिंकली होती.