
सामना ऑनलाईन । उल्हासनगर
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उल्हासनगर येथे झालेल्या सभेला नागरिकांनी अल्प प्रतिसाद दिला. उल्हासनगरमधील गोल मैदानावर शरद पवार यांचे भाषण सुरू झाले तेव्हा सभेत रिकाम्या खुर्च्याच जास्त होत्या, तसेच अनेकजण भर सभेतून उठून जात होते. कल्याण लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी मंगळवारी उल्हासनगरात या सभेचे आयोजन केले होते.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे शिवसेना-भाजप महायुतीच्या प्रचार सभांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. मात्र विरोधाकांच्या सभांकडे नागरीक पाठ फिरवताना दिसत आहेत. मंगळवारी उल्हासनगरच्या गोल मैदानात शरद पवार यांच्या सभेचे संध्याकाळी साडेसात वाजता आयोजन केले होती. या सभेला पोहोचण्यासाठी शरद पवार यांना उशीर झाला होता. रात्री 9 वाजताच्या सुमारास पवारांचे भाषण सुरू झाले. अपेक्षा होती की ते येईपर्यंत मैदान खचाखच भरलेले असेल. मात्र झालं उलटंच, शरद पवार सभास्थानी येईपर्यंत जी परिस्थिती होती ती कायम होती. पवारांचे भाषण सुरू झाल्यानंतर कंटाळलेल्यांनी मैदानातून काढता पाय घेतल्याने मोजता येतील इतकीच मंडळी मैदानात दिसत होती. यामुळे सभास्थानी रिकाम्या खुर्च्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. नागरिकांच्या अल्प प्रतिसादामुळे कल्याण मतदार संघातील आघाडीच्या पहिल्या मोठ्या सभेचा फज्जा उडाल्याचं दिसत होतं.




























































