खाऊच्या गोष्टी – भरून ‘पाव’लो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

पोर्तुगीजांचा अधिकतर वावर असणाऱ्या गोव्यातून मुंबई आणि त्यानंतर पूर्ण देशभर हा पाव पसरला.

काही कलाकार नायक न होता सहअभिनेताच राहतात, तसेच पदार्थांचेही असते. मुख्य पदार्थांचा दर्जा यांना मिळत नाही. ते नेहमी एखाद्या पदार्थाची सोबत म्हणून खाल्ले जातात. पाव हा पदार्थांमधला असाच एक सहाय्यक अभिनेता. उसळ, मिसळ, पावभाजी, वडा, भजी, खिमा, अंडे यांना सोबत करणाऱयात त्याचे इतिकर्तव्य. याच पावाची ही कहाणी.

बऱ्याचदा पाव आणि ब्रेड यांच्यात अनेकांचा गोंधळ होतो. धान्य भिजवून, शिजवून खाल्ले की, पचायला सोपे होते हे आदिमानवाला उमगल्यापासून ब्रेड अस्तित्वात आहे. या ब्रेडचा एक प्रकार म्हणजे पाव. हा पाव पोर्तुगीजांमुळे आपल्या खाण्याचा भाग झाला. वास्को-दा-गामा याने युरोपातून हिंदुस्थानकडे येण्याच्या सागरी मार्गाचा शोध लावल्यानंतर पोर्तुगीज मंडळी आपल्या देशात दाखल झाली. पोर्तुगीज मंडळी त्यांच्या मायभूमीत जो ब्रेड खात असत तोच त्यांनी हिंदुस्थानात आल्यावर बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यासाठी लागणारा मैदा किंवा यिस्ट त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे असे म्हणतात की, पोर्तुगीजांनी मैद्याऐवजी गव्हाचे पीठ आणि यिस्टऐवजी ताडीच्या थेंबांचा उपयोग करून पाव बनवला. पोर्तुगीजांचा अधिकतर वावर असणाऱया गोव्यातून मुंबई आणि त्यानंतर पूर्ण देशभर हा पाव पसरला.

पाव या नावाच्या उगमाविषयीही खूप सारे अंदाज बांधलेले दिसतात. मराठीत पाव म्हणजे एक चतुर्थांश भाग. त्यामुळे या ब्रेडला ‘पाव’ म्हटले गेले किंवा कोणे एकेकाळी म्हणे पावासाठी लागणारे पीठ पायांनी तुडवले जाई. त्यामुळे ‘पाव’ असे नाव या ब्रेडला मिळाले, पण या सगळय़ा दंतकथा ठराव्यात. पोर्तुगीज मंडळी पावाला ‘पाओ’ म्हणत असत. त्यावरूनच हे नाव या पदार्थाला प्राप्त झाले. गोव्यात पाव बेक करणाऱयाला ‘पोडर’ म्हणतात.

पोर्तुगीज 1961 सालापर्यंत गोव्यात होते. पोर्तुगीजांनंतर आलेल्या ब्रिटिशांनी ब्रेड आणला, पण त्याचा दर्जा वेगळा होता. सँडविच वगैरेसारख्या पदार्थांसाठी ब्रेड आणि स्थानिक पदार्थांच्या जोडीला पाव असे वर्गीकरण आपसूकच झाले.

सुरुवातीच्या काळात पाव खाणे ही धर्मबाह्य गोष्ट होती. ब्रिटिश काळात पाव विहिरीत टाकून लोकांना धर्मभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला जाई, पण कालांतराने पाव अगदी सहज आहाराचा भाग बनला आणि बाकीच्या संकल्पना गळून पडल्या.

आज अनेक पदार्थ केवळ पावाच्या जोडीने शोभून दिसतात. काही पदार्थांचा हेतूच स्वतःचे मोठेपण मिरवण्यापेक्षा दुसऱयाला मोठे करण्यात असतो. पावाला स्वतंत्र खाद्यपदार्थ म्हणून चवीने खाणारे विरळाच, पण अन्य पदार्थांची रंगत वाढवण्याचे काम इमानेइतबारे करणारा पाव त्यातच भरून ‘पाव’तो.

मुंबईत इराणी हॉटेल्सनी मस्कापावच्या मदतीने पाव खाणे इतके नियमित केले की, एकेकाळी हा पाव निषिद्ध होता हे पण आपण विसरलो. बनपाव, कडक पाव, लादी पाव या प्रकारांसह पाव खाणे सहज होत गेले.