दखल – सकारात्मक संदेश

शारदा प्रकाशन प्रकाशित आणि लेखक माधव जोशी लिखित ‘याला जीवन ऐसे नाव’ हे पुस्तक म्हणजे अनुभवांची, संघर्षाची गाथा आहे. आयुष्य कसे जगावे, कोणत्या प्रसंगी कसे व्यक्त व्हावे, याची सरळ व्याख्या त्यांनी मांडलेली आहे. प्रथम वाचताना हे लेखकाचे आत्मचरित्र आहे असे वाटत राहते, पण हळूहळू वाचताना उमगते, या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण म्हणजे लेखकाच्या जीवनातील ठळक आठवणी आहेत, ज्या मनात कायम स्थिरावलेल्या आहेत. आपल्या आयुष्याची मुडपलेली पाने लेखक किती सहज, प्रांजळपणे उलगडतो! मनावर खोलवर परिणाम करणारे प्रसंग मनाच्या कप्प्यात कायम राहतात, तेच प्रसंग लेखकाने कोणताही आडपडदा न ठेवता पुस्तकरूपात प्रसिद्ध केले आहेत. ज्यांच्यामुळे लेखक भूमितीतील प्रमेय शिकला, त्या मालती कापूंना हे पुस्तक समर्पित केले आहे. या लेखसंग्रहात एकूण 32 लेख आहेत आणि शेवटी निवडक कविताही समाविष्ट केलेल्या आहेत. लेखांची मांडणी, रचना मुद्देसूद असून भाषा ओघवती आहे. लेखक स्वतः या आठवणींचे निवेदन करत आहे. त्यामुळे लेखक वाचकांशी मोकळेपणाने संवाद साधत आहे असे वाटते. त्या संवादात आपलेपणा आहे, मनात सकारात्मकतेचे बीज रुजवा हा संदेश देणारे ‘याला जीवन ऐसे नाव’ हे पुस्तक नक्की वाचा. तुम्हाला जगण्याचे कारण सापडेल.