
मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी निघाले. मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामामुळे गणेशभक्त कोल्हापूरमार्गे टोल फ्री रस्त्याने कोकणाकडे निघाले असले तरी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर महामार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मार्गावरील सुमारे 3 हजार 200 किमी महामार्गाची तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील 1716 किमी लांबीच्या रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जुलै व ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल 6260 किमी लांबीचे महामार्ग व जिल्ह्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱया चाकरमान्यांना खड्डय़ातून मार्ग काढताना कसरत करावी लागणार आहे.
जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला चांगले झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. धो धो पडणाऱया पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी राज्यातील महामार्ग आणि जिल्हा रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पूर ओसरल्यानंतर जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसत आहेत. गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवण्याचे मोठे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उभे आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्य महामार्ग तसेच जिल्हा रस्त्यांचा आढावा घेतल्यानंतर राज्यात 6260 किमी लांबीच्या मार्गावर खड्डे पडले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिह्यांतील 3274 किमी लांबीच्या रस्त्यांना बसला आहे. त्यापाठोपाठ कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांतील 1716 किमी लांबींच्या रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
1300 कोटींचा खर्च अपेक्षित
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अतिवृष्टीमुळे राज्यभरात सुमारे पाचपट अधिक खड्डय़ांचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे राज्यभरातील रस्त्यावरील खड्डय़ांची डागडुजी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला 1300 कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. पण केंद्र सरकारच्या नियमानुसार एक किमी लांबीच्या रस्त्याला एक लाख याप्रमाणे 6 हजार 260 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 680 कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने 6813 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये रस्त्यांच्या डागडुजीसाठी 680 कोटी रुपयांचाही समावेश आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. हा निधी कमी असला तरी विभागासाठी असलेल्या बजेटमधून उर्वरित निधी वापरला जाणार आहे, असेही या अधिकाऱयाने स्पष्ट केले.
नदीपात्रातील पुलांचे होणार ऑडिट
अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर जिह्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे कृष्णा, वारणा, पंचगंगा आदी मोठय़ा नदीच्या मार्गातून जाणाऱया पुलांचे ऑडिट केले जाणार आहे. नोव्हेंबरपर्यंत या पुलांची पाहणी करून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.
























































