पवई आयआयटीतील विद्यार्थ्यांनी शोधला सर्वात जवळचा लघुग्रह, आकार अवघा मोटारीइतका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 पवई येथील आयआयटी मुंबईतील दोन विद्यार्थ्यांनी पृथ्वीजवळ फिरणार्‍या एका लघुग्रहाचा शोध लावला आहे. मोटारीच्या आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीपासून 2950 किलोमीटर अंतरावर फिरत असल्याचे त्यांना दिसून आले आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळ असणारा हा लघुग्रह असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आयआयटी मुंबईच्या मेटॅलर्जी विभागातील कुणाल देशमुख आणि मेकॅनिकल इंजिनियरींग विभागातील कृती शर्मा या विद्यार्थ्यांनी या लघुग्रहाचा शोध लावला आहे. हे दोघेही पृथ्वीजवळच्या लघुग्रहांवरील संशोधन प्रकल्पावर काम करतात. गेल्या रविवारी त्यांनी कॅलिफोर्नियाच्या झेडटीएफ संस्थेतून मिळालेल्या डाटाचे विश्लेषण करत असताना त्यांना त्यात एक लघुग्रह पृथ्वीपासून अगदी जवळ असल्याचे आढळले. त्यांनी तातडीने त्याची माहिती झेडटीएफला दिली.

झेडटीएफमधील संशोधकांच्या टीमने ती माहिती मिळताच तातडीने आपले टेलेस्कोप संबंधित क्षेत्रावर केंद्रीत केले. त्यावेळी त्यांना खरोखरच एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ फिरत असल्याचे दिसले. त्याला ‘2020 क्यूजी’ असे नाव देण्यात आले आहे. कुणाल आणि कृती यांचे मार्गदर्शक प्रा. वरुण भालेराव यांनी या शोधाबद्दल दोघांचेही कौतुक केले आहे. आता पुढील टप्प्यात लडाखमधील रोबोटिक ग्रोथ-इंडिया टेलेस्कोपद्वारे या लघुग्रहाचा अभ्यास केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘2020 क्यूजी’ लघुग्रह 3 ते 6 मीटर आकाराचा आहे. त्यामुळे तो पृथ्वीवर आदळला तरी हानी होण्याची शक्यता नाही. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच तो नष्ट होऊ शकतो असे संशोधक सांगतात.