
सामना ऑनलाईन । मुंबई
पवई येथे शुक्रवारी क्षुल्लक कारणावरून 26 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पवई पोलिसांनी कसून तपास करीत आरोपीला 48 तासांच्या आज गजाआड केले.
अंधेरी पूर्वेकडील बीएमसी पाइपलाइन रोडजवळ शुक्रवारी सायंकाळी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. चौकशीत मृत तरुणाचे नाव गणेश प्रधान असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याची हत्या झाली तेव्हा त्याच्यासोबत कोण होते याचा तपास पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद लाड, रायवाडे, यादव व पथकाने सुरू केला. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी आरोपीचे वर्णन सांगितले. त्याआधारे पोलिसांनी संदेश ढिंगरा या तरुणाला पकडले. चौकशीत त्याने गुह्याची कबुली दिली. गणेश आणि संदेश दोघे एकमेकांना ओळखत होते. एकत्र दारू प्यायचे. त्यातूनच दोघांचा वाद झाला. त्या वादाच्या रागातून संदेशने दगडाने डोके ठेचून गणेशची हत्या केली होती.






























































