कसारा मार्गावर आज शेवटची लोकल 10.50 वाजता, मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मालवाहतुकीच्या विशेष कॉरिडॉरसाठी मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकात गर्डर टाकण्यासाठी शनिवारी-रविवारी मध्यरात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी रात्री कसारा मार्गावर शेवटची टिटवाळा लोकल 10.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार आहे, तर कर्जत मार्गावर शेवटची अंबरनाथ लोकल रात्री उशिरा 11.51 वाजता सीएसएमटी येथून सुटणार आहे. त्यामुळे शेवटच्या लोकच्या भरोशावर उशिरापर्यंत कार्यालयात काम करणाऱयांना उद्या मात्र लवकर निघावे लागणार आहे.

रेल्वेच्या मालवाहतुकीला गती मिळावी म्हणून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यानुसार दुसऱया ओपन वेब गर्डरच्या लाँचिंगसाठी शनिवारी-रविवारी मध्यरात्री कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या व जलद आणि पाचव्या आणि सहाव्या मार्गावर मध्यरात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यंत पॉवर ब्लॉक असणार आहे. याचदरम्यान दिवा-ठाणे विभागातील दिवा रोड ओव्हरब्रिजचा गर्डर टाकण्यासाठी मध्यरात्री 01.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या आणि जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. तर आंबिवली-खडवलीदरम्यान टिटवाळा येथे रोड ओव्हरब्रिजसाठी गर्डरचे लाँचिंग मध्यरात्री 1 ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकलच्या वाहतुकीत बदल असून शनिवारी रात्री 11 वाजून 51 मिनिटांनी सीएसएमटीवरून कर्जतच्या दिशेने जाणारी शेवटची अंबरनाथ लोकल असणार आहे. तसेच कसाराकडे जाणारी शेवटची टिटवाळी लोकल सीएसएमटीवरुन 10 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. तर ब्लॉकनंतर रविवारी पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी कर्जतहून तर टिटवाळय़ाहून पहाटे 5.11 वाजता पहिली लोकल सीएसएमटीसाठी सुटणार आहे.

या लोकल गाडय़ा रद्द
पॉवर ब्लॉकमुळे उद्या अंबरनाथ येथून रात्री 9.35 वाजता सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल रद्द असणार आहे. तर कर्जत येथून रविवारी मध्यरात्री 12.24 वाजता सीएसएमटी सुटणारी लोकल रद्द असणार आहे. अंबरनाथ येथून पहाटे 3.44 वाजताची आणि 4.08 वाजताची सीएसएमटी लोकल रद्द असणार आहे. तसेच कर्जत येथून मध्यरात्री 2.33 आणि 3.40 ची सीएसएमटी लोकल रद्द असणार आहे. त्याचबरोबर अनेक मेल-एक्प्रेस गाडय़ा उशिराने धावतील.