
सामना प्रतिनिधी, संभाजीनगर
वीजचोरांविरुद्ध कारवाईची मोहीम राबवीत महावितरणचे पथक जुना बाजार भागात आले. येथे एका ग्राहकाच्या मीटरची तपासणी केली असता ते बंद असल्याचे निदर्शनास आले. पथकातील कर्मचाऱ्यांनी मीटर बंद कसे, असा प्रश्न विचारताच त्या ग्राहकाने रिमोट आणून पथकाच्या समोरच मीटर सुरू केले. हा प्रकार बघून सर्वच जण अवाक झाले. हा काय प्रकार आहे, याची शहानिशा करताच या ग्राहकाने तब्बल साडेचार लाखांची वीजचोरी केल्याचे समोर आले. दुसऱ्या एका कारवाईत वैजापूर येथेही मीटर बंद करून सर्रास वीजचोरी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी या दोन्ही वीजचोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महावितरणने 1 सप्टेंबरपासून परिमंडळात पुन्हा वीजचोराविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत वीजचोरांचा माग घेत महावितरणचे पथक जुना बाजार भागात आले. हे पथक तपासणी करीत असताना नजीमोद्दीन सिद्दीकी यांचे मीटर बंद असल्याचे आढळून आले. हे मीटर सिद्दीकी मोहंमद मुजफ्फरूद्दीन वापरत होते. याबाबत मुजफ्फरूद्दीन यांना विचारणा केली असता त्याने बाजूच्या खोलीतून लाल रंगाचे रिमोट आणून बंद असलेले मीटर चालू केले. हा प्रकार बघून मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, संजय सरग यांच्यासह पथकातील इतर अधिकारी-कर्मचारी थक्क झाले. या वीजचोरीची तीव्रता पाहता पथकाने तपासणी केली. यावेळी या ग्राहकाने 24 हजार 703 युनिट म्हणजेच 4 लाख 46 हजार 700 रुपयांची वीजचोरी केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे दोनमजली घराशिवाय या ग्राहकाने दुकानासाठीही या चोरीच्या विजेचा वापर केला. या दुकानात 9 टय़ूब, 6 पंखे, 2 फ्रिज, 2 गिझर, 2 वॉशिंग मशीन, 1 डीप फ्रिझर, 1 एअरकंडिशनर, 1 इंडक्शन हिटर (शेगडी) आणि टीव्ही अशी विजेची उपकरणे आहेत. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता संजय सरग, कार्यकारी अभियंता अभिजित सिकनीस, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीण जोशी, सहायक अभियंता महेश सोनार, प्रधान तंत्रज्ञ सुनील राठोड, वरिष्ठ तंत्रज्ञ पुंडलिक चव्हाण, तंत्रज्ञ आय. एस. खान, विद्युत सहायक मनोज वसावे, नैना पुडमते यांनी ही कारवाई केली.
वैजापूर शहरात फुलेवाडी रोडवरही अशाच पद्धतीत केली जाणारी वीजचोरी उघडकीस आली. शिक्षक का@लनीतील किसन सोनवणे या वीजग्राहकाने घरगुती जोडणीच्या वीजमीटरमध्ये फेरफार करून मीटर रीडिंग बंद करण्याचे किट बसवले होते. हा ग्राहक त्या किटच्या साहय़ाने रिमोटद्वारे वीजचोरी करीत असल्याचे महावितरणच्या पथकास आढळले. सोनवणे यांनी 2728 युनिटची वीजचोरी केली असून, ही रक्कम 43 हजार 528 रुपये इतकी होते. ही कारवाई कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, उपकार्यकारी अभियंता राजपुमार खिंडरे, उपकार्यकारी अभियंता राहुल बडवे, सहायक अभियंता राधेश्याम पुमावत, कनिष्ठ अभियंता अनिल जंगम, वरिष्ठ तंत्रज्ञ बी.बी. सरोवर, बाळनाथ झोरे, तंत्रज्ञ निकम, मोहंमद मजहर, शेख समद यांनी केली.






























































