
अॅण्टेलिया स्पह्टक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याच्या आरोपाखाली एनआयएने अटक केलेल्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याची आज 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर याच प्रकरणात अटक झालेले मनीष सोनी आणि सतीश मोतकरी यांच्या एनआयए कोठडीत 1 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली.
शर्मा, सोनी, मोतकरी यांची एनआयए कोठडी संपल्याने तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही प्रकरणांत शर्माची चौकशी पूर्ण झाल्याने एनआयएने त्याची न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची विनंती यावेळी केली होती. त्यानुसार कोर्टाने शर्माची रवानगी तळोजा कारागृहात केली. मोतकरी आणि सोनी यांनी या घटनेनंतर परदेश वारी केल्याने त्यांची चौकशी करणे आवश्यक असल्याचे एनआयएने सांगितले.
तळोजा, आर्थर रोड नको.. ठाणे कारागृहात पाठवा
प्रदीप शर्माला एनआयएच्या विशेष कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावत तळोजा कारागृहात रवानगी केल्यानंतर शर्माने लगेच कोर्टाला एक अर्ज सादर केला. तळोजा आणि आर्थर रोड कारागृहात मला धोका आहे. या दोन्ही कारागृहांत मला पाठवू नका. त्याऐवजी ठाणे कारागृहात पाठवावे, अशी विनंती केली. मात्र कोर्टाने प्रदीप शर्माचा अर्ज फेटाळून लावत संबंधित कारागृह त्यावर निर्णय घेईल, असे सांगितले. त्यामुळे प्रदीप शर्माला तळोजा कारागृहातच जावे लागले. तळोजा कारागृहात सचिन वाझे, सुनील माने हे देखील आहेत.





























































