एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या प्रदीप शर्मा यांनी पोलीस खात्यातील कारकीर्द गाजवली होती. आता ते राजकीय इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. आतापर्यंत त्यांची गन बोलायची. आता त्यांचे मन बोलणार, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

आम्ही कुणाला हरवण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी लढत असतो. त्यामुळेच चांगली माणसे आमच्याकडे येत आहेत. अजून बरेच लोक शिवसेनेत यायचे बाकी आहेत, असे सांगतानाच आम्हाला जिंकायचे आहे. कुणाचं वाईट करणं हे आमचं उद्दिष्टं नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शर्मा शिवसेनेत आलेत. आतापर्यंत त्यांची गन बोलायची. आता त्यांचे मन बोलणार, असेही ते यावेळी म्हणाले. त्यांनी प्रदीप शर्मा यांच्या कार्याचंही कौतुक केलं. एक कर्तव्य दक्ष अधिकारी शिवसेनेत आला याचे समाधान आहे. पोलीस सेवेत त्यांनी निष्ठापूर्वक काम केले. आता नव्या राजकीय कारकिर्दीत ते निष्ठेने काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शर्मा यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता थोडा धीर धरा. निवडणुका जाहीर होऊ द्या, सर्व समजेल, असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

प्रदीप शर्मा यांनीही यावेळी शिवसेना प्रवेशामागची कारणे सांगितली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव होता. पोलीस दलात असताना कोणतीही अडचण आली की मी त्यांना भेटायचो. ते आमचे प्रश्न सोडवायचे. त्यामुळेच मी आज शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत सामाजिक कामं केली. आता शिवसेनेसारख्या मोठ्या राजकीय प्लॅटफॉर्मवर काम करण्याची संधी मिळत असून त्याचं सोनं करणार असल्याचं शर्मा यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे माझे भाऊ आहेत, असेही ते म्हणाले.