श्वेतगंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रज्ञा पळसुले

घनदाट धुक्याची मऊशार शाल हळूहळू बाजूला करून पायाखाली मात्र असंख्य छोटेमोठे दगड-धोंडे तुडवत मी अखेर माझ्या आवडत्या झाडापाशी येऊन पोहोचले….
कमालीची शांतता असलेल्या या दरियादिल वातावरणात झाडाच्या वरील बुद्यावर चढून डोळे मिटून छानपैकी विसावले…
सकाळचे साडेपाच वाजले असतील…
थंड वाऱयाची एक झुळूक हुळूच मला स्पर्श करून गेली, त्याच वेळी झाडावरील पांढरा चाफा मंद हास्य करीत जमिनीवर सडा शिंपडू लागला…
जेव्हा ऋतुचक्रानुसार झाडांची पतझड होऊन अगदी वृक्षदेखील ओकेबोके होतात तेव्हा पांढरा चाफा मात्र आपले सौंदर्य खुलवून निसर्ग बहारदार ठेवण्यास मदतच करतो.
मला अगदी लहानपणापासून पांढऱया चाफ्याचे विशेष आकर्षण…
छानसे श्वेत वस्त्र पांघरून त्यावर हलकेसे पिवळे पितांबर नेसलेलं हे फुल हातात घेतल्यावर मधुरस मंद दरवळत आपल्या मनाचा ताबा घेतल्याशिवाय राहातच नाही…
पाकळ्या अगदीच नाजूक व लोभसवण्या असल्यामुळे कदाचित निसर्गाची रचना अशी असावी की ही फुलेच झाडावर तेवढय़ा जास्त उंचीवर असतात की पटकन आपला फुलांपर्यंत हातच पोहोचत नाही. मात्र माझ्यासारख्या फुलेप्रेमींना मातीला स्पर्श करून गेलेली फुलेही उचलली तरी फार समाधान मिळते… पांढऱया चाफ्याचे झाडही दिसायला खूप हिरवे बहारदार नसून राखाडी व हलक्या चॉकलेटी रंगाचे असते. याच्या फांद्या भरपूर असल्या तरी पाने मात्र त्यांच्या कामापुरती हवी तिथेच उगवतात…
म्हणून कधी कधी अनोळख्या व्यक्तींना हे झाड भुताखेतांचे वाटलंच तर काही वावगं नाही. पण प्रत्यक्षात मात्र या झाडाभोवती कमालीची सकारात्मकता अनुभवयास मिळते.
पांढरा चाफा अर्थात श्वेत चाफा हे भगवान शंकरास व श्री कृष्णास खूप प्रिय आहे. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी आपली ज्ञानसाधना औदुंबर, वड अशा प्रकारच्या पवित्र झाडांप्रमाणेच या चाफ्याच्या झाडाखालीही करायला बसायचे.
हा चाफा बऱयाच सुगंधी उत्पादनात तसेच हिंदुस्थानी आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठीही वापरला जातो. पांढरा चाफा हा अत्यंत दुर्मिळ मिळणारा चाफा आहे. पण असा हा चाफा माझ्या घराच्या काहीच अंतरावर असल्याने मी स्वतःला भाग्यशाली समजते. निसर्गाच्या अनेक सुंदर आविष्काराचे उत्तम उदाहरण हा श्वेत चाफा आहे.
आताशी उजाडायला लागलं होतं व बरीचशी फुले वारा जमिनीवर पांघरून गेला होता… मी भरभरून एकदा सुगंध घेतला आणि त्यातील काही फुले ओंजळीत घेऊन त्याना हळुवार फुंकर मारत तिथून निघाले…पुन्हा उद्या दरवळात विसवण्यासाठी…

[email protected]