
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कोणाकडे जाणार, याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. प्रफुल्ल पटेल यांनी मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, असे आज स्पष्ट शब्दांत सांगितले. मात्र, त्याचवेळी अजितदादांनंतर कोण, याची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी पक्षाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी असल्याचे मात्र पटेल यांनी अधोरेखित केले. त्यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहेत.
अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या पक्षाचे प्रमुखपद मिळवण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी भारतीय जनता पक्षाच्या मदतीने प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी तर पटेल यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे वक्तव्य करून त्यानंतर घुमजावही केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयात आज अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिले. मी अध्यक्षपदाच्या स्पर्धेत नाही. योग्य व्यक्तीला ते पद मिळेल. मात्र, अजितदादांनंतर पुढे कोण, कुठे आणि कसे ही प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून माझ्यावर आहे, असे पटेल म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह आपण सुनेत्रा पवार यांच्या घरी गेलो होतो. तिथे पार्थ आणि जय पवार हेसुद्धा होते. सुनेत्रा पवार यांनीच दादांची जबाबदारी स्वीकारावी अशी जनभावना असल्याचे आम्ही सांगितले. त्यावर सुनेत्रा पवार यांनीही आमच्या विनंतीला मान दिला. तीन दिवसांचे सुतक संपल्यानंतर त्या मुंबईत आल्या व विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करून पुढची प्रक्रिया पार पाडण्यात आली, असे पटेल म्हणाले.
विलीनीकरणाचा मुद्दा संपला, पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांनी हात जोडले
प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरणाचा मुद्दा संपलेला आहे. अजितदादा असे बोललेच नव्हते, असे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांच्या याच दाव्याबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना विचारण्याचा प्रयत्न माध्यम प्रतिनिधींनी केला, परंतु शरद पवार यांनी यावर कोणतेही भाष्य न करता हात जोडले.
विलीनीकरणाचा विषय सध्या नाही
पत्रकारांनी यावेळी प्रफुल्ल पटेल यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातही प्रश्न केला. त्यावर, सध्या विलिनीकरणाचा विषय आमच्यासमोर नाही असे पटेल म्हणाले.



























































