उमेद – वाचनाची गोडी निर्माण करणारी कम्युनिटी लायब्ररी

>> पराग पोतदार

वाचनाची आवड असलेल्या, शाळेचा अभ्यास पूर्ण करू इच्छिणाऱ्या किंवा शांतपणे बसून विचार करायला जागा हवी असलेल्या प्रत्येकासाठी खुली असणारी ही कम्युनिटी लायब्ररी. पुस्तकांनी भरलेल्या कपाटांनी वेढलेल्या एका साध्याशा खोलीत भविष्यातील आशेचे दीप उजळतील असे हे ठिकाण आहे दिल्लीतील मेहरौली वस्तीत.

वाचनाची आवड आहे, परंतु पुस्तके मिळत नाहीत अशा मुलांसाठी सुरू झालेले एक कम्युनिटी लायब्ररी सेंटर हा आशेचा दीप ठरतो आहे. शहराशहरांमध्ये अशा पद्धतीच्या कम्युनिटी लायब्ररी साकारल्या जाऊ शकतात याचीच ही एक सुरुवात ठरू शकते.

दक्षिण दिल्लीतील मेहरौली वस्तीमध्ये वसलेले कम्युनिटी लायब्ररी हे एक दुर्मिळ आणि अत्यंत गरजेचे स्थान आहे. इथे मुलांसाठी मोफत पुस्तके उपलब्ध होतात. तिथे त्यांच्यासाठी आपुलकीचे वातावरण आहे. तिथे मुले मनसोक्त वाचन करू शकतात, शिकू शकतात आणि पुस्तकांच्या सान्निध्यात वेळ घालवू शकतात. ज्या मुलांपर्यंत पुस्तके पोहोचत नाहीत तिथे त्यांच्यापर्यंत चांगली पुस्तके घेऊन जाण्याचा हा एक विधायक प्रयोग दिल्लीमध्ये सध्या सुरू आहे.

पुस्तकांनी भरलेल्या कपाटांनी वेढलेल्या एका साध्याशा खोलीत मुलं उत्साहाने पाऊल ठेवतात. काही जण एखाद्या गोष्टीत रमून बसतात. काही जण जमिनीवर वही पसरवून गृहपाठ पूर्ण करतात. तर काही फक्त निवांतपणे पानं उलटवत बसतात. 2022पासून हा रोजचा कार्यक्रम सुरू असून परिसरातील अनेक लहान मुलांचे आयुष्य घडत आहे.

ही लायब्ररी वाचनाची आवड असलेल्या, शाळेचा अभ्यास पूर्ण करू इच्छिणाऱया किंवा शांतपणे बसून विचार करायला जागा हवी असलेल्या प्रत्येकासाठी खुली आहे. इथे कोणतेही सदस्यत्व शुल्क नाही, कागदपत्रांची अट नाही आणि कोणताही अडसर नाही.

मेहरौली कम्युनिटी लायब्ररीची सुरुवात एप्रिल 2022मध्ये झाली. कोविड लॉकडाऊननंतर दिल्लीतील शाळा पुन्हा सुरू होत असतानाच हा उपक्रम आकाराला आला. अनेक महिन्यांच्या एकांतामुळे मुलांना शिकण्यासाठी किंवा एकमेकांशी जोडले जाण्यासाठी जागाच उरल्या नव्हत्या. अशा वेळी ही लायब्ररी पुढे आली आणि मुलांना एक हक्काची जागा मिळाली.

सुरुवातीला हा उपक्रम तात्पुरता होता, पण लवकरच हा उपक्रम छान रुजला. हा प्रकल्प यूकेमधील सामाजिक संशोधक ऑरलांडा रुथवेन आणि दिल्लीतील लाईफ स्किल्स ट्रेनर अनुप्रिया खरे यांनी संयुक्तपणे सुरू केला. रुथवेन गेली दोन दशके मेहरौलीत वास्तव्यास आहेत. सुरुवातीला दुसऱया लायब्ररीतून पुस्तके उधार घेऊन छोटय़ा गटांमध्ये गोष्टी सांगण्याच्या सत्रांपुरती रुथवेन यांची कल्पना मर्यादित होती. मात्र मुलं पुन्हा पुन्हा येऊ लागली. 2022च्या सुरुवातीला संस्थापकांनी एक छोटी जागा भाडय़ाने घेऊन लायब्ररी कायमस्वरूपी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

फ्री लायब्ररीज नेटवर्कच्या मदतीने पुस्तके मोफत किंवा सवलतीच्या दरात मिळवण्यात आली. तीन वर्षांत या संग्रहात सुमारे 5,000 पुस्तके जमा झाली असून 1,000हून अधिक तरुण वाचक नियमितपणे त्याचा वापर करतात. मेहरौली कम्युनिटी लायब्ररीचे व्यवस्थापन स्थानिक स्वयंसेवकांकडून केले जाते. ही लायब्ररी वापरणारी बहुतेक मुले स्थलांतरित कुटुंबांतील असून कमी सुविधा असलेल्या सरकारी शाळांमध्ये शिकणारी आहेत. त्यामुळे इथला प्रत्येक निर्णय सुलभतेचा विचार करून घेतला जातो. याशिवाय कधीच वर्गखोलीत न बसलेल्या मुलांनाही ही लायब्ररी सामावून घेते.

समान संधी राखण्यासाठी येथे कोणतेही सदस्यत्व शुल्क घेतले जात नाही. पुस्तके वाचणे आणि घरी घेऊन जाणे पूर्णपणे मोफत आहे.