जिवंत राहून जगण्यासाठी कवितेचा प्रपंच

>>प्राजक्ता शिंदे (कुडाळ, सिंधूदुर्ग)

छंद माणसाला जिवंत ठेवतो आणि जगायलाही शिकवतो. मला काव्यलेखनाची आवड आहे. वाचनाने माणूस समृद्ध बनतो आणि संकलकही. कवितेची कात्रणं जमा करता करता नकळत कधी कवितेचा हात धरला समजलच नाही. सातवीत असताना मी ‘राजकारण’ नावाची एक कविता लिहिलेली खरंतर ती कविता तेव्हा कशी काय लिहिली हे मला आजही उमगलं नाही. नंतर आजोबांचं प्रोत्साहन मिळालं की काहीतरी लिहित राहा आणि नंतर कवितेचा छंदच जडला.

 कुडाळ येथील  व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजची तृतीय वर्ष विधी शाखेची विद्यार्थिनी आहे. कधीतरी अव्यक्त भावनांना व्यक्त करावसं वाटत आणि त्या व्यक्त भावनांमध्ये कधीतरी रमावसंही वाटतं, खरंतर अव्यक्त भावनांमध्ये गुंतलेलं आपलं भावविश्व असतं आणि या भावविश्वालाच विश्व बनवावं म्हणून माझ्यातल्या कवीला मला जगवावं लागतं. आतापर्यंत नेमक्या मी किती कविता केल्या आहेत याची आकडेवारी नाही ठेवली, पण एलएलबी पूर्ण झाल्यानंतर एक कविता संग्रह बनविण्याएवढय़ा कविता मी लिहिलेल्या आहेत. कवितेचे विषय वेगवेगळे असल्याने काही विषय जुन्या मानसिकतेच्या लोकांना आवडत नाहीत. त्यांच्या प्रतिक्रियांवर उत्तर देण्यासाठीही मग आणखीन एक नवीन कविता सुचून जाते. कवयित्री संध्या तांबे, कवी अजय कांडर यासारख्या दिग्गजांकडून मला कवितेविषयी मार्गदर्शन मिळतं. आजोबांनंतर माझी आत्या शामी परब मला कविता लेखनाला प्रोत्साहन देते.

कवितेबरोबरच मला शॉर्ट फिल्म डायरेक्शन करायलाही आवडतं. आजपर्यंत मी तीन शॉर्ट फिल्मस् बनवल्या त्यांना काही स्पर्धांमध्ये नंबरही मिळाले आहेत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने आजुबाजूचा समाज माझ्या कवितेला नेहमीच नवनवीन विषय देऊन जातो. कधी कधी सुचलेल्या ओळींची कविताही बनत नाही, पण लिहिण्याची प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी नवीन प्रेरणा देऊन जाते. माणूस जन्माला आलाय म्हणजे मृत्यू अटळ आहेच, पण या मृत्यूनंतर आपण कायम अनेकांच्या मनात रुजून राहावं म्हणूनच जिवंत राहून जगण्यासाठी हा कवितेचा प्रपंच. कविता कल्पनेत जगायला शिकवते आणि कायदा हे क्षेत्र थोडसं वास्तवाकडे झुकतं. गंमत तर हीच आहे की ही दोन्ही क्षेत्र परस्परविरोधी असूनही मला माणसातल्या खऱया माणसाला ओळखायला शिकवतात. जिल्हास्तरीय अनेक काव्यलेखन स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळाली. बंगलोरचे कवी डॉ. युवराज सोनटक्के यांच्या ‘बाप’ या विषयावर आधारीत कवितासंग्रहामध्ये (संकलित) माझ्या कवितेची निवड झाली. पाचवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन 2018 मध्ये राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत कायदा विभागामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला. (पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते) आता मला एक म्युझिक अल्बम बनवायचाय, ज्या कविता मनाला भावल्या अशा काही कविंच्या कविता चाल लावून गाण्यांच्या माध्यमातून सर्वांसमोर आणायच्या आहेत.