
सामना प्रतिनिधी । नगर
बोफर्स प्रकरणावरुन काँग्रेसला लक्ष केले गेले. आता राफेल वरुन भाजप अडचणीत आली आहे. अंबानींकडे विमान निर्मीतीचा कारखाना नसताना त्यांना विमान पुरवठा करण्याचा ठेका दिला गेला. एकीकडे पंतप्रधान न खाऊंगा ना खाने दूंगा असे म्हणतात पण तिसर्याला खायला लावायचे आणि नंतर तेच आपल्या ताटात ते घेत असल्याचा आरोप भारीपचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंतप्रधान देशाच्या सुरक्षेबरोबर खेळत असल्याचा आरोप करतानाच एकाच कुटुंबासाठी देशाच्या सुरक्षितेबरोबर खेळणारा पंतप्रधान सत्तेवर ठेवायचा का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, राज्यामध्ये १२ जागा त्यांनी काँग्रेसकडे मागितल्या आहेत.
नगर येथे मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी लक्ष्मण माने, अशोक गायकवाड, अशोक सोनवणे, अनंत लोखंडे, अरुण जाधव आदी उपस्थित होते.
संविधानाला धोका असल्यामुळे सेक्युलर पार्टीबरोबर समझोता करायची आपली तयारी आहे. राष्ट्रवादीच्या संदर्भात विचारल्यावर त्यांची तपासणी करावी लागेल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. लोकसभेच्या ११२ जागा लढवायचा आहे, तसा प्रस्ताव आम्ही काँग्रेसपक्षाकडे सादर केला आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकरे त्यांच्याकडून आम्हाला उत्तर आलेले नाही, ते येईलही अशी अपेक्षा आहे, समझोता झाला नाही तर आम्ही स्वतःहा सर्व जागांवर लढणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. मात्र राज्यामध्ये काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला किंमत असल्याचे आपल्याला वाटत नाही. हा आपला व्यक्तीद्वेष नाही, व्यक्ती मला कचर्याच्या टोपलीतल्या वाटतात, असा टोला लगावून त्यांनी प्रस्ताव आम्ही पक्षाकडे पाठवला आहे. राज्यातील कोणत्याही नेत्या बरोबर आम्ही बोलणार नसल्याचा दावा त्यांनी करुन १२ जागांवर आम्ही ठाम आहोत असे सांगितले.
घराणेशाहीला आमचा विरोध नाही. घराणेशाहीचे सामाजिकीकरण होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले, दिवसेंदिवस भाजपाचे अस्तित्व आता कमी होत चालले आहे. त्यामुळे सर्वांना विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. दलित ऐक्य जर घडले असते तर भाजप सत्तेवर आली असती का, असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधानांच्या जिवाला धोका आहे. या प्रकरणावर बोलताना त्यांनी पंतप्रधानांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. त्यांना मारण्याचा विषय ही एक प्रकारची नौटंकी आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांवरील टिका ही कामचुकारपणावर होत आहे. टिका सहन होत नसल्यास त्यांनी खुर्ची खाली केली पाहिजे, असे ते म्हणाले.
भिडे गुरुजींच्या संदर्भात बोलतांना ते म्हणाले की, आरएसएसने दंगा करण्याचा अजंडा त्यांना दिला असून तो ते राबवत आहेत. वारीत वादग्रस्त वक्तव्ये करुन वारकर्यांना भटकवण्याचा प्रयत्न भिडे गुरुजींनी केला असल्याचे म्हणत दंगे करुन सत्तेत येण्याचा भाजपचा फंडा असून आम्ही त्याचा निषेध करतो. मात्र मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चौकशीचे आश्वासन दिले आहे. प्रत्यक्षात त्यांची चौकशी होणार नसून मुख्यमंत्री दिखावा करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी देण्यात आली होती मात्र त्यावर कोणती कारवाई झाली नाही. विरोधीपक्ष नेते स्वतःच्या बचावात असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना लक्ष करत नसल्याचाही आरोप आंबेडकरांनी यावेळी केला. भाजपाच्या विरोधात आता सर्वत्र मोट बांधायला सुरवात झाली आहे. त्यामुळेच आता वंचित बहुजन समाजाला सत्तेतील वाटा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगीतले.



























































