बॉलिवूड स्टार एकतर गुटखा विकतात किंवा रिमेक बनवतात, दिग्दर्शक प्रकाश झा यांचं टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिग्दर्शक आणि अभिनेता प्रकाश झा यांनी काही दिवसांपूर्वी लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी बॉलिवूड चित्रपटांच्या संहितांवरून टीकास्त्र सोडलं आहे.

सध्या प्रेक्षकांमध्ये बॉलिवूड चित्रपट आणि कलाकारांविषयी प्रचंड क्षोभ आहे. बॉयकॉट कॅम्पेनमुळे सध्या अनेक चित्रपट फ्लॉप होताना दिसत आहेत. त्यामुळे निर्मात्यांना नवीन संहितांना हात घालण्याची भीती वाटू लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश झा यांनी त्यांचं मनोगत एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.

प्रकाश झा यांना बॉलिवूड स्टार्सचे चित्रपट फ्लॉप होण्यामागचं कारण विचारण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले की, बॉलिवूड स्टार्स आजकाल गुटखा विकतात आणि जेव्हा त्यांच्याकडे वेळ असतो, तेव्हा ते रिमेक किंवा काहीतरी फालतू चित्रपट बनवतात. पण, त्यांचे पाच-सहा चित्रपट चालले नाहीत, तरीही त्यांना फारसा फरक पडत नाही, असं झा म्हणाले.

या सगळ्यावर आता नव्याने आणि गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचंही झा यांनी नमूद केलं. बॉलिवूडमध्ये आता चांगल्या संहिता येत नाहीत. त्या तुलनेने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बरीच प्रयोगशील आहे. ते अशा कथा आणतात, ज्या प्रेक्षकांना आवडतात. बॉलिवूडकर फक्त मोठे स्टार्स आणि रीमेकच्या माध्यमातून जे काही प्रेक्षकांसमोर आणत आहेत, तो कंन्टेंट नाही, असं झा यांनी यावेळी स्पष्ट केलं.