प्रख्यात निवेदक प्रकाश सेनगावकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेडचे प्रख्यात निवेदक प्रकाश सेनगावकर यांचे आज सकाळी दहा वाजता त्यांच्या गणेशनगर येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातू असा परिवार आहे. प्रकाश सेनगावकर येथील ग्रामीण बँकेमध्ये नोकरीस होते. त्यांनी 25 वर्षे ग्रामीण बँकेत नोकरी केली. सभा, संमेलनांचे निवेदक म्हणून प्रकाश सेनगावकर यांची विशेष ओळख होती. आपल्या मिश्कील स्वभावाने आणि विनोदी बोलण्यामुळे ते लोकप्रिय होते. त्यांच्या खुसखुशीत निवेदनाने अनेक सभा, संमेलने गाजली.

प्रख्यात गायक संजय जोशी आणि निवेदक प्रकाश सेनगावकर ही जोडी मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली होती. 1984 साली पहिला गीतरामायणाचा या जोडगोळीचा कार्यक्रम गणेशनगर मधील राम मंदिरात झाला. या कार्यक्रमाचे एक हजार प्रयोग राज्यभरात नव्हे तर नजिकच्या कर्नाटक व आंध्रप्रदेशातही करून ही जोडगोळी नावारुपाला आली. संजय जोशीचे गाणे प्रकाश सेनगावकरांचे निवेदन यामुळे गीतरामायणाचा हा कार्यक्रम प्रसिद्ध झाला.

माझा एक जवळचा मित्र निघून गेला आहे, अशा शब्दात त्यांचे मित्र जगदीश देशमुख यांनी शोक व्यक्त केला. प्रकाश सेनगावकर यांचे दुसरे स्नेही प्रख्यात गायक संजय जोशी यांनीही प्रकाशच्या जाण्याने माझे वैयक्तिक खूप नुकसान झाले आहे, अशा शब्दात शोक व्यक्त केला. प्रकाश सेनगावकर यांच्या पार्थिवावर गोवर्धनघाट स्मशानभूमीत सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील सर्वस्तरातील नागरिक उपस्थित होते.