
>>प्रणव कुलकर्णी
महाराष्ट्र अनेक ठिकाणी ‘पीर’ हे हिंदू आणि मुस्लिमांना पूज्य असणारी धार्मिकस्थळे आहेत. अनेक ठिकाणी आजही लग्नाआधी गावदेव म्हणजे गावातील प्रमुख दैवतांचं दर्शन घ्यायची प्रथा आहे, यात गावातील पिराचं दर्शनसुद्धा याला अपवाद नाही. असं असलं तरी महाराष्ट्रात अनेक धार्मिळस्थळे ही पीर आणि नाथपंथीय यांच्यातील वादाचा मुद्दा असलेलीही आढळतात. याचं कारण म्हणजे नाथपंथीय आणि सुफी संप्रदायाचा परस्पर संबंध. या परस्पर संबंधाची सुरुवात ही नाथ पंथीयांच्या उत्तर हिंदुस्थानातील प्रमुख केंद्र असलेल्या पेशावरपासून होऊन ती पुढे हिंदुस्थानभर सर्वत्र झाली असं अनेक संशोधकांचं मत आहे कारण सुफी पंथाचा हिंदुस्थानातील प्रवास हा इराण ते सिंधमार्गे झालेला आढळतो.
महाराष्ट्र अनेक ठिकाणी ‘पीर’ हे हिंदू आणि मुस्लिमांना पूज्य असणारी धार्मिकस्थळे आहेत. अनेक ठिकाणी आजही लग्नाआधी गावदेव म्हणजे गावातील प्रमुख दैवतांचं दर्शन घ्यायची प्रथा आहे, यात गावातील पिराचं दर्शनसुद्धा याला अपवाद नाही.
असं असलं तरी महाराष्ट्रात अनेक धार्मिळस्थळे ही पीर आणि नाथपंथीय यांच्यातील वादाचा मुद्दा असलेलीही आढळतात. याचं कारण म्हणजे नाथपंथीय आणि सुफी संप्रदायाचा परस्पर संबंध.
या परस्पर संबंधाची सुरुवात ही नाथपंथीयांच्या उत्तर हिंदुस्थानातील प्रमुख केंद्र असलेल्या पेशावरपासून होऊन ती पुढे हिंदुस्थानभर सर्वत्र झाली असं अनेक संशोधकांचं मत आहे कारण सुफी पंथाचा हिंदुस्थानातील प्रवास हा इराण ते सिंधमार्गे झालेला आढळतो.
या प्रवासात सुफी संतांनी नाथपंथी याच्यांकडून हटयोगाचं घेतलेले प्रशिक्षण आणि त्यांच्याकडून हिंदू चालीरीतींचं झालेलं अनुकरण हा संशोधनाचा विषय आहे. या काळातच ‘अमृत कुंड’ या हटयोगावरील ग्रंथाचं अरबी भाषेतील भाषांतर आणि नंतर फारसीमधला त्याचा अनुवाद हे याच गोष्टींचा परिपाक आहे.
यामुळेच नाथजोग्यांना इस्लामी जगतात जोगी म्हटलं गेलं आहे.
नाथपंथीय असलेल्या यापैकी अनेक जोग्यांचा कापड विणणे आणि सूत कातणे हा व्यवसाय होता. हे जोगी साऱया उत्तर आणि पूर्व हिंदुस्थानात पसरलेले होते त्यातील अनेक जण हे मुसलमानांच्या आगमनानंतर हळूहळू मुस्लिम होत गेले. जोग्यांपासूनच पीर नावाचा मुस्लिमांमध्ये एक वर्ग झाला त्याची पुढे जुगी नावाची जात तयार झाली. हजारीप्रसाद द्विवेदींच्या मते कबीर अशाच नवधर्मांतरीत कुटुंबात वाढलेले होते त्यामुळे कबिरांच्या मनावर नाथजोग्यांचा प्रभाव असणे सहाजिकच आहे. हा प्रभाव त्यांच्या लिखाणातही मध्ये मध्ये जाणवतो.
कबीरांनी आपल्या एका पदात म्हटलं आहे –
सो जोगी जाकें मनमें मुद्रा ।
रात दिवस ना करई निद्रा।।
मनमें आसण ,मनमें रहणा ।
मनका जप तप मनसूं कहँणा।।
मनमै खपरा मनमैं सींगी ।
अनहद बजावै रंगी।।
पंच प्रजारि भसम करि भूका ।
कहै कबीर सो लहसै लंका।।
पुढे सुफींमध्ये अनेक सिलसिले म्हणजेच उप पंथ तयार झाले. यात काही पंथ हिंदू प्रभावाखाली होते तर काही इस्लामी कट्टरता पाळणारे होते. यातील चिश्ती आणि सुर्हावर्दी हे दोन पंथ हिंदुस्थानात विशेषतः लोकप्रिय झाले यातील अनेकांची कवने इतकी प्रसिद्ध होती की, त्यातील निवडक कवनांचा संग्रह गुरुग्रंथसाहेबमध्येसुद्धा घेतलेला आहे.
कश्मिरींमध्येसुद्धा हिंदूंच्या धर्मांतरणाला सुफी पंथीयांमुळेच जोर आला. कश्मिरी हे शैव संप्रदायाचे केंद्र ते सुफी शैवांचा रुषी संप्रदायाचं केंद्र आणि त्यानंतर पूर्णपणे सुफींचा प्रभाव असणारा भाग हे स्थित्यंतर हा टप्पा कायम दुर्लक्षित आहे.
नाथ संप्रदायाविषयी असणाऱया गैरसमजातून हा संप्रदाय तंत्र-मंत्र प्रकारातील पंथ वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र नाथपंथाने वर्णाश्रमधर्माबरोबर कर्मकांड, तंत्र या गोष्टींना विरोधच केला यामुळेच हा पंथ अगदी तळागाळापर्यंत सर्व जातींमधे, मुस्लिम, विणकर, अस्पृश्य इ.पर्यंत पोहचू शकला.
रा.चिं.ढेरें यांनी सुफी-नाथ पंथीयांवर बराच प्रकाश टाकला आहे. गोरक्षनाथांच्या अनेक शिष्यांमधे अनेक मुस्लिम शिष्यही होते. यात बाबा रतन हाजी हा पेशावरला राहणारा प्रमुख मुस्लिम अनुयायी होता. आजही काबूलचे जोगी त्यांना ‘बाबा रतन हाजी के फकीर’ म्हणून ओळखतात. या रतन हाजीने पुढे ‘काफीरबोध’ हा ग्रंथ लिहिला त्यात त्याने हिंदू मुस्लिमांच्या भेदावर बोट ठेवत आपण सगळे एकच आहोत असे सांगितले आहे. गोरक्षनाथ एके ठिकाणी हिंदू मुस्लिमांना उद्देशून म्हणतात –
‘वेद कनबे को लेकर क्यो लडते हो। राम रहिम के नाम पर क्यो झगडते हो । ईश्वर एक है, दोनोंका एक है। वह निराकार, निरंजन, अलख, अगोचर है। उनकी शक्ती समस्त जगत् में परिव्याप्त है । इसी परम पदका योगी ध्यान करता है ।।
सेतू माधवराव पगडींच्या मते ‘खुलताबाद आणि दौलताबाद सुफींच्या धर्मप्रसाराची प्रमुख ठिकाणे होती’. याचा सुफींच्या ठिकाणांच्या निवडीचा शोध आपल्याला मुहमद तुघलकाच्या देवागिरी ही दुसरी राजधानी म्हणून केल्यानंतरच्या घडमोडींवरून लागतो. तत्कालीन इतिहासकार बर्नी याने तुघलकाने आपल्याबरोबर अनेक मुस्लिम पंडीत, सुफी साधूंना या भागात आणल्याची नोंद केली होती. यामागे नव्या भू-प्रदेशात इस्लामचा प्रसार होऊन आपल्या राज्याला एक आधाराची फळी निर्माण व्हावी हा होता.
महाराष्ट्रातील अनेक नाथ पंथीय स्थळांशी सुफींचा निकटचा संबंध जाणवतो. उदा. नगरमधील ‘मढी’ हे कानिफनाथांचे स्थान.
पिरांचे साजरे होणारे उत्सव, यात्रा, जत्रा, नवस, धुपारती, पूजा या हिंदू संस्कृतीचा पडलेला प्रभाव स्पष्ट आजही जाणवतो. नाथ पंथ आणि सुफी हा संबंध फक्त येवढय़ावरच थांबत नाही तर तो अधिक विस्तृत आणि व्यापक आहे, तो संबंध आधात्मिक तत्त्वज्ञानाच्या संबंधाबरोबरच आचार, विचार, पोषाख, चालीरीतींर्यंत आहे. परकीय भूमितून आलेला असला तरी सुफी संप्रदायाने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतिक पटलावर बराच प्रभाव टाकलेला आढळतो.





























































