साय-फाय – आत्मा अमर नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • प्रसाद ताम्हनकर

‘मृत्यूनंतरचे जीवन’, ‘आत्मा’, ‘चेतना’ हे विषय कायमच सर्वसामान्यांना भुरळ घालत आलेले आहेत. ‘मृत्यूनंतर जीवन असते’ याविषयी आपला धर्म ठामपणे होकार देत असतो. त्या विषयाचे अनेक ग्रंथदेखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. मात्र ‘मृत्यूनंतरच्या जीवनाला’ विज्ञान ठामपणे नाकारत असते. सध्या याच विषयावर एका शास्त्रज्ञाचा दावा वादाचे कारण बनला आहे.

हिंदू धर्मानुसार आणि इतरही काही धर्मांत आत्मा हा अमर मानला जातो. शरीर सोडल्यानंतर आत्मा हा मुक्त होतो असे आपल्या हिंदू धार्मिक परंपरेनुसार मानले जाते. आत्मा अविनाशी आहे असेदेखील आपली धार्मिक, आध्यात्मिक परंपरा सांगते. जगभरात अनेक धर्म आहेत, त्यांच्या विविध रुढी-परंपरा आहेत आणि जन्म किंवा मृत्यूकडे बघण्याची प्रत्येकाची एक वेगळी परंपरा किंवा श्रद्धा आहे. मात्र ‘आत्मा’ आणि त्याचा अविनाशीपणा हा विषय सर्वच धर्मात विस्तृतपणे चर्चेला आलेला आहे. मात्र आता एका वैज्ञानिकाच्या दाव्याने या सगळ्या धार्मिक संकल्पनांनाच आव्हान दिले आहे.

‘आत्मा’ यासंदर्भात अध्यात्म आणि विज्ञान यांच्यात कायम दुमत होत आले आहे. मृत्यूनंतर केवळ शरीर राहते, आत्मा मात्र मुक्त होतो असे अध्यात्म सांगते, तर मृत्यूनंतर आत्म्याच्या कोणत्याही अस्तित्वाला विज्ञान स्वीकारत नाही. आता ह्याच जीवन आणि मृत्यूसंदर्भात ‘कॉस्मोलॉजिस्ट’ असलेल्या डॉक्टर सीन कॅरॉल यांनी असा दावा केला आहे की, सगळे काही विज्ञानाच्या नियमानुसार, भौतिकशास्त्राच्या नियमानुसार होते. मानवाच्या मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचे ‘जीवन’ संभव नाही! प्रोफेसर कॅरॉल यांनी आजवर भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी आयुष्य वेचले आहे. त्यांच्या अभ्यासानुसार मानवाच्या मृत्यूनंतर त्याची कोणतीही ‘चेतना’ ब्रह्मांडात उरण्याची शक्यता नाही. कॅरॉल यांचा हा दावा सध्या जगभरात मोठय़ा प्रमाणावर चर्चेत आलेला आहे.

डॉक्टर कॅरॉल यांच्या दाव्यानुसार अनेक धार्मिक मान्यता असे सांगतात की, मानवाच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ब्रह्मांडात अस्तित्व टिकवून राहतो. परंतु जर आपण विज्ञान आणि मुख्यतः भौतिकशास्त्राचे नियम समजून घेतले, तर आत्म्याचे अस्तित्व असणे किंवा कोणत्याही प्रकारे आपल्या मेंदूत असलेली माहिती, आठवणी आत्म्याच्या स्वरूपात अथवा इतर कोणत्याही मार्गाने ब्रह्मांडात टिकून राहणे शक्य नाही.

अर्थात सध्यातरी या विषयाचा अभ्यास करणाऱया जगभरातील कोणत्याही वैज्ञानिकाने प्रोफेसर कॅरॉल यांचा दावा खोडून काढलेला नाही अथवा त्याला समर्थनदेखील दिलेले नाही. मात्र काही वैज्ञानिकांनी या दाव्याचा विचार करता मानवी मेंदूच्या अजून अभ्यासाची नितांत गरज असल्याचा मुद्दा मांडला आहे.

प्रोफेसर कॅरॉल पुढे म्हणतात की, मी देव अथवा एखादी शक्ती आहे असे मानू नका; असे बिलकूल सांगणार नाही. मात्र विज्ञान एखाद्या गोष्टीबद्दल काय दावा करते हेदेखील प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. एका बाजूला धर्म ‘आत्मा अविनाशी आहे’ असे ठामपणे सांगत असताना प्रोफेसर कॅरॉल यांचा दावा मात्र त्याचे पूर्णपणे खंडन करणारा आहे. मानवाच्या मृत्यूनंतर त्याचे कोणत्याही प्रकारचे अस्तित्व उरणे विज्ञान ठामपणे नाकारते. त्यामुळेच कॅरॉल यांच्या दाव्यावर सध्या धर्म आणि विज्ञान अशा दोन्ही बाजूंनी वादविवाद सुरू झाले आहेत.

[email protected]