भाजपच्या पराभवासाठी प्रशांत किशोर यांचा विरोधी पक्षांना महत्त्वाचा सल्ला

prashant-kishore

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपच्या विरोधात एकवटलेल्या सगळ्या विरोधी पक्षांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. भाजपला हारवणे कधी शक्य होईल हेच त्यांनी आता स्पष्टपणे सांगितले आहे. भाजपच्या विरोधात सगळे विरोधक एकवटले तरीही फक्त तेवढे उपयोगाचे नाही. विरोधी पक्षांनी एकजूट कायम राखली पाहिजे, एकजूट हा फक्त एक देखावा आहे. फक्त नेते एकत्र आल्याने भाजपला हारवणे शक्य नाही, असे मत व्यक्त करत भाजपला सक्षम पर्याय देण्याची गरज प्रशांत किशोर यांनी व्यक्त केली आहे.

भाजपाला आव्हान द्यायचे असेल तर तुम्हाला भाजपाची ताकद, त्यांची बलस्थाने काय आहेत, त्यांचे हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि कल्याणवाद काय आहे तो समजायला हवा. भाजपाला आव्हान द्यायचे असेल तर कुठल्याही विरोधकाला या तीन गोष्टी विचारात घेऊन त्यांना आव्हान द्यावे लागेल. हिंदुत्ववादी विचारधारांशी लढा देण्यासाठी विचारधारांची एकजूट आवश्यक आहे. गांधीवादी, आंबेडकरवादी, समाजवादी आणि कम्युनिस्ट या विचारधारा महत्त्वाच्या आहेत. मात्र या विचारधारांच्या नावे तुम्ही अंधविश्वास ठेवू शकत नाही. त्या विचारधारा भाजपच्या विचारधारेला टक्कर देऊ शकतात का? याचा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.

प्रशांत किशोर म्हणाले की, मी सध्या पाहतोय विरोधी पक्षाचे नेते एकमेकांच्या सोबत दिसत आहेत. कुणी कोणासोबत लंच करतंय कुणी कुणासोबत चहा घेतंय. मला विचारधारांची युती झालेली बघायला आवडेल. कारण एकत्र जेवण करणं आणि चहा पिणं ही भाजपला हरवण्याची पद्धत नाही. प्रशांत किशोर सध्या जन सुराज यात्रेत बिहारचा दौरा करत आहेत. बिहारचे राजकारण हे अनेक चुकीच्या समजुतींसाठी प्रसिद्ध आहे. तसंच जातीपातींमध्ये अडकलेलं आहे. आत्ता आम्ही असा प्रयत्न करत आहोत की इथे लोक काय करू शकतात? ते किती सक्षम आहेत यासाठी बिहार ओळखला जाईल, असे त्यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेबाबत ते म्हणाले की तुम्ही जेव्हा सहा महिने चालता, भारत जोडोसारखी यात्रा काढता त्यावेळी तुम्हाला पक्षामध्ये काही बदल झालेले दिसले पाहिजे. ही यात्रा काँग्रेसचं भवितव्य ठरवणारी आहे. माझ्यासाठी यात्रा म्हणजे मिशन नाही तर ज्या भागात ती जाते तो भाग समजून घेण्याचा प्रयत्न आहे, असेही प्रशांत किशोर म्हणाले.