प्रशांत किशोर जनता दल संयुक्तला रामराम ठोकणार ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशांत किशोर हे जनता दल संयुक्त या पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किशोर यांनी सातत्याने नागरिकत्व संशोधन विधेयकाला विरोध केला आहे. याच मुद्दावरून ते हा पक्ष सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वृत्ताबाबत ‘जदसं’च्या नेत्यांना विचारले असता त्यांनी म्हटले आहे की किशोर यांना पक्ष सोडायचा असेल तर त्यांनी खुशाल सोडावा आणि स्वत:चा रस्ता निवडावा.

नागरिकत्व कायदा बोकांडी मारू नका, पश्चिम बंगाल, पंजाब, केरळ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा ठाम विरोध

 

‘जदसं’ चे सरचिटणीस आरसीपी सिंह यांनी म्हटले आहे की ‘जर किशोर यांना पक्ष सोडायचा असेल तर त्यांनी तो खुशाल सोडावा, तसंही ते अनुकंपा तत्वावर या पक्षात भरती झालेले आहेत.’ किशोर यांनी गेले काही दिवस सातत्याने नागरिकत्व संशोधन विधेयकाला विरोध करणारी ट्विट केली आहेत. याबाबत सिंह यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले होते. यावर त्यांनी किशोर यांच्यासवर टीका करताना काही प्रश्न विचारले. कोण आहे प्रशांत किशोर ? ते पक्षात केव्हा आले? पक्षसंघटनेसाठी किशोर यांनी काय काम केले ? आणि आता ते इथे काय काम करत आहेत ? असे प्रश्न सिंह यांनी विचारले. किशोर यांच्यासारखी मंडळी अनुकंपा तत्वावर पक्षात आले आहेत, आमि जर ते पक्षाच्या ध्येयधोरणांशी सहमत नसतील तर त्यांनी खुशाल आपला रस्ता निवडावा.

सिंह यांनी म्हटले की नितीश कुमार यांनी प्रशांक किशोर यांना सन्मान दिला, मात्र याबदल्यात किशोर काय करत आहेत ? किशोर यांच्यासारखी लोकं पक्षात अपार मेहनत केलेल्यांसमोर उभी ठाकत आहेत. नुसते ट्विट करून काहीही होत नाही. सिंह यांना पत्रकारांनी विचारले की किशोर यांच्यावर काय कारवाई केली जाणार ? यावर बोलताना ते म्हणाले की त्यांच्याविरूद्ध कोणतीही कारवाई केली जाणार नाही कारण ते पक्षात कोणतेही महत्वाचे पद सांभाळत नाहीये.

किशोर यांनी शुक्रवारी एक ट्विट केलं होतं ज्यात त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की ‘नागरिकत्व संशोधन विधेयक संसदेत बहुमताने पारीत झाले आहे. न्यायपालिकेव्यतिरिक्त आता 16 गैरभाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांवर देशाच्या आत्म्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. पंजाब, बंगाल आणि केरळ या तीन राज्यांनी CAB आणि NRC लागू करण्यास नकार दिला आहे आणि आता इतर राज्यांवर याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली आहे.’

‘जदसं’ ने पक्षाच्या नेत्यांना वादग्रस्त विधाने करू नका असा आदेश दिला होता. मात्र हा आदेश धुडकावून लावत किशोर यांनी त्यांची मते मांडणे सुरू ठेवले आहे. त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी किशोर यांच्या विधानांबाबत बोलताना म्हटले आहे की जर पक्षाच्या मताशी सहमत नसाल तर असे मुद्दे पक्षाच्या मंचावरच मांडणे गरजेचे आहे.